शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा नाराजीनामा……
आज सत्तासंघर्षाचा राजकारणात सत्तेला अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आजच्या काळातील सत्ता व सत्तेतून मिळणारे लाभ म्हणजे एक व्यसन झालेले आहे. त्यातूनच आज सत्ता संघर्षासाठी मोठ्या प्रमाणात पक्षीय राजकारणाचा विचार करता आज सर्वच पक्षांमध्ये दलबदलू करणाऱ्या नेतृत्वाची संख्या ही खूप मोठी आहे. त्यामुळे आज देशपातळीवर आणि राज्य राजकारणामध्ये दलबदलू करणाऱ्या नेतृत्वाची मोठ्या प्रमाणात चालती आहे. त्यातून आज अनेक राजकीय पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षांतरे होताना दिसतात. पक्षांतरांमागची महत्त्वाची भूमिका म्हणजे सत्तासंघर्षाच्या राजकारणात न मिळालेले पद, न मिळालेली उमेदवारी त्यातून आलेली नाराजी आणि वर्तमानकाळात ईडीच्या प्रभावाखाली राजकारणात आपल्या साम्राज्याला धक्का लागू नये ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांतरे होताना दिसत आहे. राजकीय पक्षांतर झाल्यानंतर पक्षांतर करणारे आपले अस्तित्व कायम राखतात आणि त्या अस्तित्वाच्या आधारावर आपण इतरांना वाकवू शकतो हा धमकीवजा इशारा देण्यात माहीर असलेले धूर्त राजकारणी आज प्रत्येक राजकीय पक्षांना आव्हान देऊ लागले आहेत. त्यातूनच आज प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये नाराज असणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्याचे आपल्याला दिसून येते.
त्यातून सध्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य हे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जगासमोर येत आहे.'गेले ते कावळे राहिले ते मावळे' या ब्रीद वाक्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र करणाऱ्यांवर प्रहार करणारी शिवसेना आणि शिवसैनिक पक्षातून बाहेर गेलेल्या कावळ्याचे राजकारण नक्कीच संपवतात हा आजपर्यंतचा इतिहास असतानाही शिवसेना सोडणारे शिवसेनेला आणि शिवसैनिकांना डिवचण्याचे प्रयत्न कधीकधी करताना दिसतात. आजपर्यंत एक दोघांनी शिवसेनेला नामोहरण करण्याचा प्रयत्न करून पाहिला पण वास्तविक पाहता त्यांनाही ते शक्य झालं नाही त्यांना त्यांच्या राजकारणासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागला ही वस्तुस्थिती आहे. त्यातून अनेक जण राजकारणात मंत्री झाले पण ते मंत्री होत असताना त्यांचा तो स्वाभिमानी बाणा शिवसेनेत असताना होता तो स्वाभिमानी बाणा त्यांनी मंत्रिपदासाठी कुठेतरी गहाण टाकला हे मात्र निश्चित आहे. अशाच लोकांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला पण प्रत्यक्षात ते पक्ष सोडणारे नेतृत्व संपले पण अद्यापही शिवसेना संपली नाही याचे एकमेव कारण म्हणजे शिवसेनेचे खंबीर असलेली पाळेमुळे. शिवसेनेच्या खंबीरपणामुळेच शिवसेनेने ज्यांना चेहरा नाही, ज्यांना नेतृत्व नाही, त्याच्या सात पिढ्यांत कोणी साधा सरपंच नाही त्याला आमदार खासदार मंत्री करून त्यांचा उद्धार शिवसेनेने केला ही महाराष्ट्रातील वस्तुस्थिती आहे.
सध्याच्या वर्तमान काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याअगोदर शिवसेनेतील अनेक लोकांना मंत्रिपदाची स्वप्ने पडली होती. त्या स्वप्नात महाविकास आघाडी मुळे मिठाचा खडा पडला ही वस्तुस्थिती आहे. तडजोडीच्या राजकारणामध्ये शिवसेनेने काय गमावले ह्यापेक्षा काय कमावले याचा विचार करता ज्या मुख्यमंत्रीपदावरून महाभारत घडले ते मुख्यमंत्रीपद सेनेने हस्तगत केले. तडजोडीच्या राजकारणात शिवसेना तहात जिंकली पण प्रत्यक्षात मात्र निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात काही प्रमाणात हरल्ल्याचे दिसून आले.तरीसुद्धा निष्ठावंत शिवसैनिकांनी आपली नाराजी कधी प्रसारमाध्यमांसमोर आणली नाही हा त्यांच्या मनाचा आणि त्या शिवसैनिकांचा मोठेपणा आहे. ज्या शिवसैनिकांच्या जोरावर आपण निवडून आलो आहोत ते मात्र शिवसेनेचे आणि शिवसैनिकांचे छात्र हे मात्र या ठिकाणी नक्कीच विसरले आहेत ही वस्तुस्थिती आहे.
महाविकास आघाडीमुळे शिवसेनेच्या काही नेतृत्वाच्या भावना दुखावलेले आहेत कारण त्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे ही वस्तुस्थिती आहे. ज्या शिवसेनेच्या नेतृत्वाचे अस्तित्व महाविकास आघाडीमुळे धोक्यात आलेले आहे अशा नेतृत्वाने नाराजी व्यक्त करणे हे स्वाभाविक आहे. पण काही लोकांना शिवसेनेच्या माध्यमातून आमदारकी, खासदारकी, मंत्रिपद मिळाली, शिवसेनेमुळे ओळख मिळाली अशा लोकांनी व शिवसेनेमुळे आपण सध्या पदावर आहोत अशा लोकांनी आपली नाराजी जाहीर प्रगट करणे हा कुठेतरी शिवसेनेशी केलेला विश्वासघात आहे.शिवसेनेतील काही नेतृत्वाच्या सध्याच्या प्रतिक्रिया पाहता त्यांच्या भावना आता काही लपून राहिलेल्या नाहीत. त्यातून शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आता उघड उघड पक्षविरोधी भूमिका घेताना दिसून येत आहेत.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे कामे होत नाहीत, शिवसेनेच्या खात्यांना कमी निधी मिळणे ह्या विषयावरून वाद विवाद होत आहेत. त्यातून शिवसेना लोकप्रतिनिधींची होणारी नाराजी पाहता या ठिकाणी दोष हा शिवसेना पक्षाचा नसून हा दोष केवळ आणि केवळ निवडून आलेल्या शिवसेना लोकप्रतिनिधींचा आहे असे दिसून येते. शिवसेना पक्षात माजी झालेल्या लोकप्रतिनिधींचे काम होत नाहीत हे स्वाभाविक असू शकते, पण आजी पदाधिकाऱ्यांची काम होत नाही हा एक मोठाच वादाचा विषय आहे. शिवसेनेत नाराजी असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे शिवसेना लोकप्रतिनिधीच्या मागे लागलेली ईडीची ससेमिरा ही काही संपत नाही आणि अशा वेळी पक्ष त्यांच्या बाजूने खंबीर उभे राहणं गरजेचं असताना पक्ष नेतृत्वाकडून त्याची दखल घेतली जात नाही याची ही मोठ्या प्रमाणात दबक्या आवाजात चर्चा होत आहे आणि त्यामुळे ज्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे त्यांची ही नाराजी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. वास्तविक पाहता शिवसेना पक्षात जे माजी लोकप्रतिनिधी झालेले आहेत त्यांच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देणे गरजेचे आहे, कारण त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. एकंदरितच आजच्या राजकारणाचे स्वरूप पाहता लोकप्रतिनिधींना सत्तेची पडलेली स्वप्न आणि चटक पाहता शिवसेनेतील काही लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात आघाडीवर असल्याचे दिसून येते.
एकंदरीतच शिवसेनेतील नाराजांची यादी पाहता ही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. शिवसेनेतील नाराजांची वाढती संख्या लक्षात घेता नाराजांना आपल्यात सामावून घेण्यासाठी अनेक जण टपून आहेत. वास्तविक पाहता शिवसेनेतील नाराजांना आपल्या पक्षात घेण्यासाठी जे आतुर झालेले आहेत त्यांचा इतिहास पाहता त्यांची दुकानदारी ही बाहेरून आयात केलेल्या लोकांवर अवलंबून आहे. पण हे आयात केलेले लोकप्रतिनिधीच्या स्वप्नांना जर तुम्ही धुमारे फुटू दिले नाही तर ते तुमच्यावर कधी उलटतील याचा नेम नाही. हे माहीत असूनही त्यांची अवस्था अशी झालेली आहे की स्वतः शिकार करता येत नसल्यामुळे नेमका कोणता प्राणी कधी मरतो याची वाट हे चातकासारखे पाहात आहेत. शिवसेनेतील नाराजांची चाहूल पक्ष नेतृत्वाला नाही अशातला ही प्रश्न नाही.त्यामुळे शिवसेना नेतृत्वाने आता तरी जागे होणे गरजेचे आहे. कारण आता खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाला, शिवसेना पक्ष नेतृत्वाला आणि शिवसेनेत काम करणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना आता आत्मचिंतन करण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे.त्यामुळे शिवसेना पक्ष नेतृत्वाने आजी माजी लोकप्रतिनिधींचे एक आत्मचिंतन शिबिर घेऊन आपण पक्ष म्हणून कुठे कमी पडतोय, लोकप्रतिनिधींनी आपण पदावर असतांना कुठे कमी पडतोय, ह्याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आता शिवसेनेवर येऊन पडल्याचे दिसून येते.








