https://www.google.com/adsense/new/u/0/pub-4475133060821869/sites/detail/url=bkilche.blogspot.com चौफेर : November 2020
animated-fireworks-image-0061 animated-rose-image-0045चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे animated-rose-image-0045 मी कोणाला शिकवत नाही मी फक्त ते शिकू शकतील असे वातावरण देतो” - अल्बर्ट आईन्स्टाईन 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐💐 animated-bird-image-0155 -image-1310" />

Monday, November 23, 2020

लिंगायत हे हिंदू नाहीत…

 लिंगायत हे हिंदू नाहीत…

मनुष्याच्या रानटी अवस्थेपासून ते सुसंस्कृत समाजापर्यंतच्या वाटचालीतील विकास प्रवाहात अनेक घटकाचा समावेश होतो. या घटकांमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक या घटकांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या घटकांचा विचार करता मनुष्य या घटकापासून दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे या प्रत्येक घटकाचा परस्परांशी सहसंबंध असल्यामुळे प्रत्येक घटकाचा विकास एकमेकांवर अवलंबून आहे. मनुष्याच्या विकासाकरता यातील एखादाही घटक जर कमी झाला तर त्याला माणूस म्हणून समाजात योग्य स्थान मिळत नाही. म्हणून मनुष्याला ह्या सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी समाजातच वावरावं लागतं. म्हणूनच माणूस हा समाजशील प्राणी आहे असे म्हटले जाते. 

    माणूस समाजात राहिला म्हणजे केवळ समाजशील प्राणी होतो असं नाही तर त्या समाजाचे नियम विचार हे त्याला पाळणं गरजेचे ठरतात. समाजाचे आचार-विचार पाळताना नैतिकता, अनैतिकता या गोष्टीचाही विचार होऊ लागला. त्यामुळे नैतिक गोष्टींना प्राधान्य देण्यात येऊ लागले. नैतिकता पाळण्यासाठी समाजाने काही नियम, आचार-विचार तयार केले. त्यातून  धर्म संस्थांचा उदय झाला. लोकशाही शासन पद्धती अस्तित्वात येण्याच्या अगोदर धर्म संस्थांची मोठ्या प्रमाणात चालती होती. धर्म संस्थांच्या आदेशाप्रमाणे निसर्गाच्या ज्या  क्रिया, प्रक्रिया घडतात त्या ईश्वराच्या इच्छेनुसार होतात म्हणून धर्माच्या विचार होताना ईश्वराचे अस्तित्व मान्य केल्या गेलं. म्हणून ईश्वराच्या इच्छेनुसार आपण आपलं जीवन जगतो हा विचार समाजात रुजविण्यासाठी धर्मशास्त्र सांगणाऱ्या पवित्र ग्रंथांच्या आधारावर शासन चालविणारे जे राज्य आहे  त्याला धर्मसत्ता किंवा धर्मशाही म्हटल्या जाऊ लागले.धर्माचे रक्षण व प्रसार करणे हे या राज्याचे प्रमुख कर्तव्य मानल्याने धर्माचे महत्त्व वाढले.आपला धर्म हाच खरा व सर्वश्रेष्ठ आहे अशी भूमिका  अनेक धर्माच्या धर्मगुरूंनी व अनुयायानी घेतली.त्यामुळे परधर्माविषयी असहिष्णूवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याने धर्मांतराच्या नावाखाली आपल्या धर्माकडे लोकांना आकृष्ट करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्या गेली. तसेच काही धर्मातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांचा विरोध करून धर्मात सर्वसमावेशकता आणण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक संघर्ष हा पाहायला मिळतो. 

    धार्मिक संघर्षाचा इतिहास पाहता समकालीन काळात कर्नाटकामध्ये लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलन हे पुढे आले. त्याच प्रेरणेतून महाराष्ट्रातही लिंगायत स्वतंत्र धर्माच्या आंदोलनाची आखणी करण्यात आली. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चे व इतर समाजाचे मोर्चे निघाले त्याचप्रमाणे स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी सुद्धा महाराष्ट्रात लिंगायतांचे अनेक मोर्चे निघाले. पण लिंगायत धर्म आंदोलनाच्या संदर्भात लिंगायत धर्मामध्ये वीरशैव लिंगायात, वीरशैव की लिंगायत, हा वाद मोठ्या प्रमाणात समोर आला. त्यातूनच स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीच्या आंदोलनात दोन गट पडल्या गेले. एक समर्थन करणारा दुसरा विरोध करणारा. त्यातुनच समाज माध्यमावर लिंगायत धर्माच्या संदर्भात समर्थन करणाऱ्यांना धर्मफोडे  हा शब्द याठिकाणी वापरल्या जाऊ लागला आहे. तसेच लिंगायत हे हिंदू धर्माचा एक भाग आहेत हा ही विचार पुढे मांडण्यात आला. त्यामुळे लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनाच्या संदर्भात संशोधकवृत्तीने चिकित्सा करणं गरजेचं ठरतं. म्हणून प्रस्तुत लेखात धर्म, हिंदू धर्म, वीरशैव, लिंगायत या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

धर्म

भारतीय राज्यघटनेने धार्मिक स्वातंत्र्य मान्य केल्यामुळे व धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक व खाजगी बाब असल्याने समाजातील प्रत्येक व्यक्ती आपआपल्या धर्माच्या तत्वांचे पालन करताना आपल्याला दिसून येतात. एकंदरीतच आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजात प्रत्येक व्यक्तीच्या भावना,श्रद्धा,इच्छा,ह्या कुठेतरी गुंतलेल्या असतात. त्यामुळे  याच भावना, श्रद्धा, इच्छेपोटी सामाजिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी  प्रत्येक जण एक आचरण पद्धती स्वीकारतो व त्या आचरणाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचा एक  सामाजिक दृष्टिकोन विकसित होतो त्या प्रक्रियेला आपल्याला धर्म असं म्हणता येईल.म्हणूनच आपले सामाजिक जीवन परिपूर्ण करण्यासाठी व जीवनातील दोषमय पद्धती व अशांततामय वातावरण काढून टाकणारे, आपापल्या धर्माचे तत्वज्ञान समाजातील काही लोक पाळताना दिसून येतात.म्हणून धर्मांचे महत्त्व सांगताना आपल्याला असे म्हणता येईल की, सत्याचा व अस्तित्वाचा शोध सागुन जीवनाचे स्थान व अंतिम सत्य व ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रत्येकाला धर्माची आवश्यकता असते. म्हणूनच आज जगात वेगवेगळ्या प्रकारचे धर्म अस्तित्वात आल्याचे आपल्याला दिसून येतात. आज भारतात हिंदू, बौद्ध,इस्लाम, ख्रिश्चन, जैन हे धर्म आपल्याला पहावयास मिळतात. प्रत्येक धर्म हा सत्या पर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतो, सत्याचे अस्तित्व जाणवून देतो. म्हणूनच धर्म ही संकल्पना अत्यंत व्यापक स्वरूपाची आहे. म्हणून धर्म ही संकल्पना अभ्यासण्यासाठी आपल्याला जे. एच्. ल्यूबा यांनी वेगवेगळ्या विचारवंताच्या सांगितलेल्या ४८व्याख्या,त्याच्या स्वतः च्या व्याख्या,विल्यम जेम्स,जेम्स फ्रेझर,एमील द्यूरकेम,ब्रॉनीस्लॉ मॅलिनोस्की,जी.गॅलोवे,आर्.आर्.मॅरेट,टॉमसअक्वाय्‌नस,रूसो,रॉबर्टसन स्मिथ इ. सारख्या विचारवंतांचे धर्मावरील विचार हेच समजून घेणे गरजेचे ठरते. कारण गेल्या  अनेक वर्षांत पृथ्वीवर पसरलेल्या प्राथमिक अवस्थेतील मानवी समाजांपासून ते औद्योगिक, वैज्ञानिक क्रांती पर्यंत मानवी समाजामध्ये धर्मसंस्था नाही, अशी कोणतीही  समाजव्यवस्था दिसत नाही. पण ह्याच समाजात धर्म मानणाऱ्या आस्तिक व  न मानणाऱ्या नास्तिक व्यक्ती सुध्दा सर्वच धर्मात सापडतात.मुळातच धर्म हा मानवी मनाची एक चंचल अवस्था आहे. म्हणून सामाजिक जीवनाला व्यापकत्व व नियमबद्धतेची आवश्यकता धर्माकडून पूर्णत्वास जाते. आज प्रत्येक धर्माचे तत्त्वज्ञान विचार, श्रद्धा, उपासना, ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असल्या तरी मात्र प्रत्येक धर्माचा आधार मानवतावाद हा आहे हे आपल्याला मान्य करावाच लागते. पण ह्या मानवतावादाकडे जाण्यासाठी प्रत्येक धर्मामध्ये रूढी, प्रथा, परंपरा यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. म्हणून प्रत्येक धर्मातील रूढी, प्रथा परंपरा या नष्ट व्हाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात धार्मिक, सुधारणा व सामाजिक सुधारणा चळवळी झालेल्या असल्या तरीही आज भारतीय समाजात धार्मिकतेचा विचार करता भारतीय समाज हा सूर्यफुलासारखा विविधतेने नटलेला असल्याचं आपल्याला दिसून येतो. म्हणूनच आज आपल्याला भारतातील सगळ्यात मोठ्या हिंदू धर्मामध्ये मोक्षमार्ग,कर्मकांड,योगमार्ग,भक्तिमार्ग,ज्ञानमार्ग,सामाजिक नैतिकता, ह्या आचरणाच्या शैली रूढ झाल्याचे आपल्याला दिसून येते.

हिंदू धर्म

एकंदरीतच हिंदू धर्माविषयी बोलताना आपल्याला असं म्हणता येईल की, हिंदू धर्माच्या स्थापनेचा, संस्थापकचा विचार करता कोणत्याही एका व्यक्तीकडे या धर्माचे संस्थापकत्व जात नाही. कारण हिंदू धर्म हा विशिष्ट धर्मग्रंथ व विशिष्ट धर्मसंस्थापक या अधिकृतता देत नाहीत. त्यामुळे या धर्माचा उदय केव्हा व कसा झाला, हे निश्चितपणे सांगणे अतिशय कठीण आहे. तरीसुद्धा हिंदू धर्माविषयी,हिंदू धर्म या संकल्पनेविषयी अनेक वेगवेगळ्या विचारवंतांनी आपली मत मांडलेली आहेत ती  प्रमाणभूत म्हणून हिंदू धर्म,हिंदू ह्या मूळ शब्दाचा आपल्याला आधार घेणे क्रमप्राप्त ठरते.मुळातच हिंदू हा शब्द प्रदेश वाचक असल्याचे आपल्या लक्षात येते. कारण आज आपण भारत या शब्दाचा विचार करतो त्यावेळेस या भारत या शब्दाविषयी अनेक दृष्टिकोन विकसित  झाल्यामुळे आपल्या देशाला भारत हे नाव कसे पडले त्याचा इतिहास आपल्यासमोर येतो. आजच्या सिंध व पंजाब या प्रांताला सप्तसिंधुन् किंवा सप्तसिंधुषू या नावाने ओळखले जात होते म्हणजेच पंजाब प्रांतातून सात नद्या वाहतात त्यांतील सर्वांत पश्चिमेकडची नदी म्हणजे ‘सिंधू’ नदी होय. सिंधूच्या पूर्वेकडील प्रदेशात राहणारे लोक ते सिंधू किंवा हिंदू.तसेच पारशी लोकांच्या अवेस्ता या ग्रंथात  या   भागाला 'हप्तहिंदू' हा शब्द येतो. तसेच वेदांच्या काही भागात 'सिंधुंन्' असा शब्द आहे त्यावरूनच सप्तसिंधू त्याच्या ऐवजी सिंधू हा शब्द रूढ झाल्याचा आपल्याला दिसून येते. सिंधू या शब्दाचं पर्शियन रूपांतर हिंदू हे असल्यामुळे हिंदू व हिंदुस्थान अशी नावे आपण वापरतो. मुळात हिंदू हे नाव वरील माहितीवरून प्रदेशवाचक आहे. परंतु हे प्रदेशवाचक नाव  हिंदू धर्माचे नाव म्हणून कसे पडले याचा विचार करता  प्रत्येक धर्माचे एक तत्त्वज्ञान असते, दैवते व उपासनामार्ग असतात, सामाजिक आचार-विचार नियम धर्माने घालून दिलेले असतात, म्हणजेच  प्रत्येक धर्माने आपल्या अनुयायांसाठी अचारसंहिता ही तयार केली असते. ती एकाच प्रदेशात राहणाऱ्या लोकांना लागू होत असते. त्यातुनच सिंधू प्रदेशात अनेक जमाती आपले वेगळेपण सांभाळुन राहत होत्या. त्यांतील एका जमातीचे नाव ‘आर्य’ असे होते. या आर्यांच्या आगमनापूर्वी भारतात प्रचलित असलेले लौकिक धर्म आणि आर्यांचा वैदिक धर्म यांच्या संमिश्रणामुळे हिंदू धर्म उदयास आला, असे विद्वान मानतात. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या अवशेषांतून सिंधू धर्माचे जे रूप प्रकट झाले आहे, ते हिंदू धर्माचे एक प्राचीन रूप होय. या आर्यांनी स्वतःचे वाङ्मय तयार केले होते. या वाङ्मयाला ‘वेद’ असे नाव आहे. ( हिंदूधर्म: मराठी विश्वकोश) एकंदरीतच हिंदूंचे धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करताना  हे ग्रंथ या धर्माला ‘हिंदू धर्म’ म्हणत नाहीत,तर ते ग्रंथ या धर्माला आर्य धर्म, वैदिक धर्म, सनातन धर्म, वर्णाश्रमधर्म ह्या वेगवेगळ्या नावाने पुढे आणताना दिसतात. म्हणूनच एक प्रदेश वाचक असलेला शब्द हा हिंदू धर्म मानावा का ? यावर मोठी चर्चा सुरू असते.तरी सुद्धा हिंदू धर्माविषयी  वेगवेगळ्या विचारवंताच्या संकल्पना जर अभ्यासल्या तर हिंदू धर्माविषयीचे विचार स्पष्ट होतात.  


तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, ‘हिंदू धर्म हा बहुरूपी आणि परस्परविरोधी प्रवृत्तींचे संमिश्रण होऊन बनलेला आहे. या धर्माच्या दोन बाजू आहेत. विशिष्ट प्रकारच्या सामाजिक चालीरीती किंवा समाज-रचनेचे विशिष्ट कायदे ही याची सर्वांत प्रमुख अशी बाजू आहे आणि परस्परविरोधी अनेक पारमार्थिक संप्रदाय ही त्याची दुसरी प्रमुख बाजूहोय.’ तसेच ‘हिंदू धर्म ही विविध सामाजिक आचारविचारांची एक गठडी किंवा एक संग्रह आहे आणि विसदृश आध्यात्मिक व पारलौकिकविविध कल्पनांचाही त्यात भरणा आहे.’ ( हिंदूधर्म: मराठी विश्वकोश) 


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् म्हणतात, ‘अनेक उपासनामार्ग, विविध उपास्य देवता, बहुविध धर्मद्रष्टे यांचा त्यात संग्रह आहे. हा धर्म व्यक्तिनिष्ठ नाही हा विशिष्ट पंथाचा आग्रह धरीत नाही हा धर्म अधिकारभेदाने सगळे धर्म संग्राह्य आहेत असे मानतो, अनेक प्रकारचे पारमार्थिक उन्नतीचे पंथ यांच्यामुळे हिंदू धर्म परमतसहिष्णू झाला आहे.’ ( हिंदूधर्म: मराठी विश्वकोश) 


‘वेदांविषयी प्रामाण्यबुद्धी, साधनांची अनेकता आणि उपास्य दैवत कोणते असावे यांविषयी निश्चित नियम नसणे, हे हिंदू धर्माचे लक्षण होय. ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हे तत्त्व स्वीकारून पारंपर्यागत व श्रुतिस्मृति-पुराण-प्रतिपादित विधिसंस्कार किंवा आचार पाळणारा तो हिंदू होय’, असे लोकमान्य टिळक म्हणतात.( हिंदूधर्म: मराठी विश्वकोश) 

 

वरील विचार पाहता हिंदू धर्माची संकल्पना ही अतिशय व्यापक स्वरूपाची असल्याचे आपल्याला दिसून येते.एकंदरीतच हिंदुधर्माचा इतिहास पाहता वेदांपासून याची सुरुवात होते. वेद, वेदांगे, उपनिषदे यांच्या अभ्यासावरून वेगवेगळे विधी व आचार,चार वर्णाश्रम,आश्रम, धर्म-अर्थ-काम-मोक्ष  हे चार पुरुषार्थ, सृष्टीची निर्मिती व सृष्टीचा विकास याचा विचार  हिंदूंच्या सामाजिक जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येतो.वैदिक काळातील सिंधू प्रदेशाचा इतिहास पाहता याठिकाणी फक्त आर्यच नव्हते तर त्या सोबत  निषाद, नाग, शबर अशा अनेक जमाती इथे वास्तव्य करीत होत्या  त्यांच्ये ही  देव-देवता, आचार-विचार, व उपासनेचे नियम होते. मुळातच ह्या वेदपूर्व जमाती  शिव या दैवताला मानणाऱ्या होत्या  असे  वेगवेगळ्या अभ्यासावरून निदर्शनास येते.आर्य हे इतर जमातींच्या संपर्कात राहिल्यामुळे वैदिक धर्मीय आर्य व निषाद यांच्यात विवाह होत.वेदवाङ्मय निर्माण झाल्यावर आर्य ही जमात अधिक सुसंस्कृत व स्पृहणीय समजली गेली. आर्यांचा वाढता  प्रभावामुळे निषाद, नाग, शबर ह्या जमाती आर्यांच्या संस्कृतीत ओढल्या गेल्या. त्यांनी आर्यांचे इंद्र, वरुण, यम, अग्नी इ. दैवते व यज्ञाचा उपासना-मार्ग स्वीकारला. त्याचबरोबर आर्यांनीही त्यांच्या शिव व इतर दैवतांचा समावेश आपल्या दैवतसमूहात करून घेतला. म्हणजेच याच काळात आर्यांनी वैदिक परंपरा केंद्रस्थानी ठेवून व इतर जमातींवर जबरदस्ती न करता त्यांना आत्मसात करून घेऊन हा धर्म वाढवला त्याला हिंदू धर्म हे नाव मिळाले. 

    भारतावरील बाह्य आक्रमण होऊन शक, कुशाण, हूण, ग्रीक अशा अनेक जमाती भारतात आल्या. परंतु संमिश्रणाच्या प्रक्रियेने या जमाती हिंदू झाल्या. तसेच अनेक परकीय लोकांनी  हिंदू जीवन शैली व तत्त्वज्ञानाचा अंगीकार केल्यामुळे ते स्वतः हिंदू बनले. तसेच  देशात होणारी वेगवेगळी धर्मांतरे पाहता धर्मांतर केलेल्या लोकांना  मूळ प्रवाहात आणण्याची जी काही परंपरा याठिकाणी सुरू झाली, त्यातून शुद्धीकरणाची प्रक्रिया याठिकाणी रुजवली गेली, त्यात या ठिकाणच्या वैदिक व श्रेष्ठ जाती पुढे होत्या. त्यामुळे वैदिक व श्रेष्ठत्वाचा याठिकाणी मोठा पगडा राहिला. त्यामुळे  या ठिकाणी अनेक समूह आपले स्वतः चे अस्तित्व गमावून बसले.त्यामुळे एकंदरीतच प्राचीन काळापासून ते आज पर्यंत हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार होताना श्रेष्ठत्वाचा  प्रभाव राहिल्यामुळे हिंदू धर्माची मालकी काही ठराविक समूहाकडे गेली, त्यामुळे हिंदू धर्मातील आपले श्रेष्ठत्व कमी होऊ नये याचा विचार करून हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम या ठिकाणी होत असतानाच या धर्मामध्ये अनेक चढउतार झाल्याचे आपल्याला दिसून येतात.म्हणून वैदिक धर्म वाढवताना आर्येतर जमातींनी आर्यांची जीवनशैली स्वीकारून.आर्यांनी आर्येतर जमातींच्या देव-देवता व उपासना-पद्धती यांचा समावेश करून घेऊन वैदिक धर्माचा विस्तार केला व पुढे तो हिंदू धर्म बनला. एकदरित वैदिक धर्माच्या इंद्र-वरुणादी देवता मागे पडून त्यांच्या जागी शिव, विष्णू अशा देव-देवतांची रूढ झाल्या.वैदिक व अवैदिक द्राविड धर्माचे एकीकरण झाल्यामुळे हिंदू धर्मात होम व यज्ञ यांना दुय्यम स्थान मिळून पूजेला प्राधान्य प्राप्त झाले. यज्ञविधीचे महत्त्व कमी होऊन मूर्तिपुजा, ईश्वर, देऊळ, पूजेचे नियम, देवांच्यायात्रा या गोष्टींना हिंदूंच्या जीवनात महत्त्व प्राप्त झाले.

    कालांतराने रामायण व महाभारत या महाकाव्यांची निर्मिती झाली. कालांतराने हिंदू धर्माचे शैव,वैष्णव या मुख्य पंथांत विभाजन झाले. तसेच या दोन पंथांतून अनेक उपपंथ निर्माण झाले.याकाळात कर्मवाद, पाप-पुण्य,पुनर्जन्म, स्वर्ग-नरक,या गोष्टीचा बोलबाला वाढला.चातुर्वर्ण्याची संकल्पनेचा विचार करता वर्ण हे जन्मावरून ठरू लागले.वैदिकेतर जमाती या जातिरूपाने हिंदू समाजाचा भाग होत्या पण त्यांना चातुर्वर्ण्याच्या बाहेर ठेवल्याने चातुर्वर्ण्यही जातिजातींत विभागले गेले त्यामुळे हिंदू समाज हा आता जातींचा समूह  बनला.जातिव्यवस्थेतुन स्पृश्यता अस्पृश्यता निर्माण होऊ लागली. तसेच हिंदू धर्माचा विस्तार होत  असला तरीही अनेक पंथांत हिंदू धर्माची  विभागणी होऊ लागली.  होत असली तरी निर्माण झालेले पंथानी मूळ हिंदू धर्माचा त्याग न करण्याचे धोरण पाळल्यामुळे हिंदू धर्माचा प्रभाव वाढतच गेला. कालांतराने हिंदूधर्मास भागवत धर्म असे ही म्हणल्या जाऊ लागले. इस्लाम धर्माची आक्रमणे व त्यांचा सत्तेचा अंमल भारतात सुरू झाल्यावर त्यांनी हिंदूंच्या मूर्ती व देवळे यांचा विध्वंस करण्यास सुरुवात केली. तेव्हा हिंदूंनी आपल्या पंथांच्या पलीकडे जाऊन स्वतःची ‘हिंदू’ म्हणून ओळख मिटू न देण्यासाठी भीतीपोटी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. त्यातून आपल्या पंथाचे तत्त्वज्ञान व दैवत याचा विचार न करता आपली ओळख घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून आपले वेगवेगळे पंथ कायम ठेवून आपण मुसलमान, ख्रिस्ती यांच्यापेक्षा वेगळी व परस्परांना अधिक जवळचे आहोत, ही भावना विकसित केली. कालांतराने देशात वेगवेगळ्या राजवटी आल्या, वेगळ्या राजवटीच्या काळातही हिंदू धर्माने आपले अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. 

    कालांतराने इंग्रजांची सत्ता याठिकाणी रुजल्या गेली. इंग्रज सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामाजिक आर्थिक सुधारणा होऊ लागल्या.एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदुस्थानात समाजसुधारकांनी नवीन धार्मिक,सामाजिक सुधारणा चळवळी सुरू केल्या.इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावामुळे आपल्या स्वतःच्या विकासासाठी पुरोहितवर्गाची व कर्मकांडाची गरज नाही.प्रार्थना, सामूहिक चिंतन यांच्याद्वारे आपण अशा परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो, हिंदू धर्मात असलेल्या रूढी, प्रथा, परंपरा,अनेकेश्वरवाद या आपल्या मागासलेपणाची कारणे आहेत ह्या गोष्टी समाजसुधारकांचा लक्षात येऊ लागल्या. त्यातूनच रूढी,प्रथा, परंपरेला फाटा देऊन एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या विचाराचा गट पुढे आला.यातूनच ब्राह्मो समाज, प्रार्थनासमाज,असे नवे विचार प्रवाह पुढे आले. पण हेच होत असताना हिंदू धर्मावर अन्याय अत्याचार होतोय या विचारातून वेदांकडे परत चला याचा आग्रह  आर्यसमाजा ने धरला. तसेच स्वामी विवेकानंदांनी सुधा हिंदू धर्माचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येतात. इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावामुळे राजा राममोहन रॉय, रामकृष्ण परमहंस,स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा भावे ह्यानी हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तसेच दक्षिणेतील जस्टिस पार्टीने जातीयता व अस्पृश्यता यांनाप्रखर विरोध करून हिंदू धर्मातील दोष दाखवण्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येते.

    कर्मवाद व  पुनर्जन्म ह्यावर हिंदू धर्माचा विश्वास आहे.   कोणताही  मानव प्राणी या जन्मात नीतीला धरून किंवा नीतीचे उल्लंघन करून कामे करतो, त्या कर्मांची फळे याच जन्मात भोगतो नाहीतर तीफळे त्याला पुढच्या जन्मात भोगावी लागतात, असा हा कर्मसिद्धान्त  सांगतो.तसेच प्राण्याचा पुढचा जन्म म्हणजे प्राण्याच्या आत्म्याचे मरणानंतर सध्याच्या शरीरातून नवीन शरीरात जाणे होय. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तहोणे यालाच मोक्षप्राप्ती म्हणतात. यावर हिंदू धर्माचा विश्वास आहे.तसेच हिंदूंचे आचार-विचार ठरवण्यासाठी काही ग्रंथसंपदा निर्माण झाले त्यामध्ये मनुस्मृती व याज्ञवल्क्यस्मृती या प्रसिद्ध आहेत. पतंजलीचे योगशास्त्र, वेद, उपनिषदे, स्मृती, भारत, ब्रह्मसूत्रे, पूर्वमीमांसा, सांख्यशास्त्र, योगशास्त्र व पुराणे हे प्रचलित हिंदू धर्माचे प्रमाणग्रंथ होत.एकदरित हिंदू धर्मात अनेक पंथ आहेत,अनेक दैवतेही आहेत. त्यांचे उपासनेचे अनेक वेगवेगळे  मार्ग आहेत. ते वेगवेगळ्या मार्गाने ईश्वरापर्यत जाण्याचे प्रयत्न करतात. 

वीरशैव

वीरशैवच्या संदर्भात बोलताना असं म्हटल्या जाते की वीरशैव आणि लिंगायत हे पर्यायवाचक शब्द आहेत. त्याचा प्रसार आणि प्रचार ही तसाच केला जातो. म्हणजेच भारत आणि इंडिया असे आपण आपल्या देशाला संबोधतो त्यातला हा प्रकार आहे असे ही दाखवल्या जाते. मुळात वीरशैव  आणि लिंगायत ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.(चेनबस्पा: लिंगायत हे विरशैव नव्हेत) एकंदरीतच पंचाचार्याच्या सांगण्यावरून वीरशैव हा हिंदू धर्माचा भाग असेल तर ते कधीही लिंगायत होऊ शकत नाहीत. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की लिंगायत वीरशैव यामधला जो संघर्ष आहे तो संघर्ष अनेक वर्षापासूनचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे आहे की हिंदू शैव पंथातुन आलेल्या आणि बसवण्याच्या लिंगायत या प्रवाहात समाविष्ट झालेल्या अनेक लोकांनी ही मूळ समस्या निर्माण केलेली आहे.मुळातच त्यामागे काळामुखी,पाशुपत,कापालिक, लकुलीक्ष, काही नाथपंथी आणि आंध्रातील आराध्य शैव  ब्राह्मण हे प्रमुख आहेत.(जामदार: लिंगायत कालसुसंगत धर्म) त्यामुळे या संघर्षामध्ये जर मूळ पाया पाहिला तर आंध्राच्या आराध्य ब्राह्मणांनी आपले मूळ ब्राह्मणत्व सोडलेलं नाही. ते बसवण्णांनी आणि शरणांनी स्थापित केलेल्या लिंगायताचे आचरण व तत्वे ह्याचे संपूर्णपणे पालन करत नाहीत. त्यामुळे वीरशैव लिंगायत हा वाद मोठ्या प्रमाणात चघळत चाललेला आहे. मुळातच काल्पनिक कथांच्या आधारावर पंचपीठाची त्यांनी निर्मिती केलेली आहे आणि त्या आधारे वीरशैव लिंगायत मधील संघर्ष लावला जात आहे. तसेच "मी शैव होतो, वीरशैव झालो आहे, असे बसवण्णा म्हनतात,त्यांच्या वचनात कुठेही लिंगायत पदाचा वापर झालेला नाही" असे पंचाचार्य व डॉ. चिदानंद मूर्ती यांनी सांगितल्यामुळे ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. (दर्गा: लिंगायत हेच सत्य ) मुळातच बसवण्णाच्या वचनांमध्ये वीरशैव हे पद कोठेही दिसत नाही, तसेच बसवण्णांच्या समकालीन साहित्यामध्येही वीरशैव हे पद कोठेही दिसत नाही, परंतु 1368 मधील  'बसवपुराण' पाल्कुरिके सोमनाथाच्या बसव पुराणांमधील वीरमाहेश्वर पदा यावजी 'वीरशैव' व पदाचा वापर भीमकवीने केलेल्या आहे हे मात्र निश्चित आहे. मुळातच वचन साहित्यामध्ये वीरशैव शब्द हा कुठेही आढळत नाही परंतु त्याकाळात वीरशैव व्रत हे प्रचलित होते हे ही मान्य करावे लागते. म्हणून वीरशैव हे एक व्रत आहे. एकंदरीतच शरणांचा या व्रताला विरोध आहे आणि त्यातूनच वीरशैववाद्यानी लिंगायत धर्मावर आतिक्रमण करून वीरशैव धर्म पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीतच सर्व अभ्यासावरून असे निदर्शनास येते की शरणांच्या वचनामध्ये लिंगायत लिंगवंत या पदाऐवजी वीरशैव या पदांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. म्हणजेच बसवण्णाच्या मूळ वचनात वीरशैव हे पद घुसवण्यात आलेलं आहे हे आपणास मान्य करावेच लागते. तसेच शरणांच्या वचनामध्ये लिंगायत पेक्षा लिंगवत पदाचा जास्त वापर करण्यात आलेला आहे. मुळातच लिंग धारण करणाऱ्यांना लिंगायत असे म्हटले जाते. म्हणून वचनामध्ये आलेले वीरशैव हे एक पद आणि व्रत आहे. त्याचा लिंगायत धर्माशी कोणताही संबंध नाही.तसेच वीरशैव आणि लिंगायत याचा परस्पर बांद्रायण संबंध जोडण्याचे काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

लिंगायत धर्म

     भारतातील धर्म परंपरेचा अभ्यास करताना हिंदू, जैन, बौद्ध शीख, पारशी,इस्लाम, अशा अनेक धर्मांचा अभ्यास करावा लागतो. भारतीय धर्म परंपरे मध्ये काही धर्म हे भारतातच स्थापन झाले तर काही धर्म हे भारता बाहेरून भारतात आल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे भारतीय धर्म परंपरेचा अभ्यास करताना वैदिक परंपरा व अवैदिक परंपरा याचाही विचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो. वैदिक परंपरेचा विचार करता त्यामध्ये प्रामुख्याने हिंदू धर्माचा समावेश होतो. म्हणूनच हिंदू धर्माच्या संदर्भात ज्यावेळेस आपण अभ्यास केला त्यावेळेस हिंदू धर्माला वैदिक,सनातन, भागवत धर्म अशी वेगवेगळी नावे असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहेत. अवैदिक परंपरेचा विचार करता जैन, बौद्ध, लिंगायत या धर्माचा विचार केला जातो. 

    भारतीय धर्म परंपरेमध्ये अस्तित्वात असलेल्या धर्माच्या व्यतिरिक्त या ठिकाणी बाराव्या शतकांमध्ये बसवेश्वरांनी आणि त्यांच्या  शरणानी  सामूहिकरीत्या अनुभव मंडपात लिंगायत धर्माची स्थापना केली. एकंदरीतच लिंगायत धर्माच्या संस्थापका विषयी ज्यावेळेस विषय येतो त्याच वेळी  अनेक ग्रंथांमध्ये लिंगायत धर्माचे संस्थापक म्हणून बसवण्णाचा उल्लेख आढळून येतो म्हणून बसवण्णा हेच लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत याबाबतीत तिळमात्र शंका नाही. बसवण्णांंनी वैदिक धर्मातील वेद, शास्त्र, पुराण स्मृति, वर्णव्यवस्था,यज्ञ, जातीयता, कर्मसिद्धांत, पुरोहितशाही, देवालय, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, शूद्र अशूद्र, स्त्रियांचा तत्कालीन दर्जा याचा विचार करून सर्वसामान्यांच्या मुळ अस्तित्वावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समतामूलक सिद्धांताच्या संकल्पनेवर आधारित लिंगायत धर्माचं तत्त्वज्ञान हे जगासमोर मांडल्याचे आपल्याला दिसून येते.

    मुळातच दक्षिण भारतामध्ये लिंगायताची संख्या अधिक प्रमाणात आहे त्यातल्या त्यात कर्नाटकामध्ये ही संख्या अधिक आहे. वैदिक कालीन धर्म परंपरेमध्ये संस्कृत भाषा ही ज्ञानदानाची भाषा होती. त्यामुळे संस्कृत भाषा ही सर्वसामान्याची ज्ञानभाषा नव्हती. त्यामुळे बसवण्णांनी कन्नड भाषेतून आपली वचने मांडली. म्हणूनच कन्नड भाषेतील पहिले साहित्य म्हणून पुढे आलेल साहित्य म्हणजे वचन साहित्य होय. बाराव्या शतकामध्ये बसवण्णांनी जी धार्मिक क्रांती केली ती केवळ धार्मिक क्रांतीचं नव्हती तर धार्मिक, आर्थिक, राजकीय क्रांती होती. कारण समाजातील सर्व घटकांमध्ये त्या काळात बसवण्णांनी स्व त्वाची जाणीव करून दिली.बसवण्णांनी खऱ्या अर्थाने श्रमजीवी बहुजनांचा लिंगायत धर्म पुढे आणण्याचे काम त्या काळात केले. बाराव्या शतकातील लिंगायत धर्मामध्ये मातंग, डोहर परीट, नावडी, न्हावी या सर्व श्रमजीवी समुदायांचा समावेश या धर्मात होता म्हणजेच एकंदरीतच सर्व प्रकारच्या श्रम करणाऱ्या बहुजनांना त्यांच्या स्वत्वाची व हक्काची जाणीव करून देऊन समतेवर आधारित दक्षिण भारतातील निर्माण झालेला हा पहिला लिंगायत धर्म होय.

     मुळातच लिंगायत हा अवैदिक धर्म आहे. त्यामुळे वैदिक तत्त्वाचा पुरस्कार करणाऱ्या हिंदू धर्मातील सर्वच संकल्पना या धर्मात नाकारल्या जातात. परंतु लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक भाग आहे ही संकल्पना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रूजली आहे. परंतु खऱ्या अर्थाने लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे, लिंगायत हे हिंदू नाहीत हे आपल्याला मान्य करावेच लागते, त्यासाठी लिंगायता मध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे गरजेचे आहे. कारण भारतात झालेल्या 1871 च्या पहिल्या जनगणनेमध्ये मध्ये लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून नोंद आहे.1881 दुसऱ्या जनगणनेमध्ये मध्ये लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणून नोंद करण्यात आलेली नाही.लिंगायत मधील सर्व उपजाती ह्या हिंदू धर्मातील शूद्र गटांमध्ये नोंदवण्यात आलेल्या आहेत.1881च्या जनगणनेत शूद्र म्हणून झालेल्या नोंदी विरुद्ध म्हैसूर राज्यात आंदोलन करण्यात आले.1891च्या जनगणनेत लिंगायत त्यांना स्वतंत्र कोड दिला पण त्यांचं शुद्र नसल्याचे मान्य करण्यात आले नाही त्यामुळे नंतरच्या 1931 पर्यंत होणाऱ्या जनगणनेत लिंगायत धर्माची स्वतंत्र अशी नोंद नाही तर हिंदु धर्मातील एक जात म्हणून लिंगायतांची नोंद करण्यात आली. त्यामुळे अनेक शतकापासून लिंगायत हे शूद्र असल्याचा चुकीचा गैरसमज हा इतर समाजात पसरवला गेला आहे. त्यामुळे या धर्माचा वचन साहित्याचे सूक्ष्मपणे विवेचन केले असता लिंगायत कधीही शूद्र नव्हते, ब्राह्मण नव्हते, एवढेच काय तर ते हिंदूही  नव्हते हे स्पष्ट होते.(पहा लिंगायत स्वतंत्र धर्म:कलबुर्गी,महादेवप्पा: लिंगायत हिंदू नव्हेत,2004) त्यामुळे लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे आणि लिंगायत स्वतंत्र धर्म मागण्याचे जे काही निकष आहेत त्यांमध्ये प्रत्येक धर्माला एक प्रमाण ग्रंथ असणे गरजेचे आहे त्या दृष्टीकोनातून लिंगायतांची वचने ही प्रमाण आहेत. लिंगायत एकेश्वरवादी धर्म असून त्यात इष्टलिंगा शिवाय दुसरा कशाचीही पूजा केली जात नाही. पण लिंगायतावर हिंदू संस्कृतीचा, हिंदूं धर्माचा प्रभाव पडल्यामुळे आज लिंगायत इतर देवतानाही पुजताना दिसतात  तरीही लिंगायत हे हिंदू होऊच शकत नाहीत, त्यामुळे लिंगायत हे हिंदू नाहीत हे आपणास ठामपणे सांगता येईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या जाती आपल्याला पाहावयास मिळत आहेत त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चार वर्णात अनेक जाती समाविष्ट झालेल्या आहेत. पण लिंगायतामध्ये कोणते ही जातीभेद नाहीत. सर्व लिंगधारी सर्वजण समान आहेत. म्हणजेच कोणालाही लिंगायत होता येते. म्हणून लिंगायत समताधिष्टित  व समतामूलक स्वतंत्र असा धर्म आहे. तसेच हिंदू धर्मामध्ये ज्या काही प्रथा परंपरा पाळल्या जातात त्यांच प्रथा परंपरा आजही इतर धर्मामध्ये ही पाळल्या जातात त्यामुळे त्या धर्मांना स्वतंत्र  धर्माचा दर्जा आहे तसाच लिंगायत धर्माला सुद्धा स्वतंत्र असा दर्जा आहे हे टीकाकारांनी मान्य केलं पाहिजे.

     एकंदरीतच वीरशैव व लिंगायत यांच्यामधला संघर्ष पाहता या संघर्षाची किनार ही अत्यंत जुनी असली तरी खऱ्या अर्थाने कर्नाटक सरकारने लिंगायत धर्म हा स्वतंत्र धर्म आहे असा जो ठराव मान्य केला त्यावेळेस पासून पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी मोठ्याप्रमाणात भडकलेली आहे. त्यामुळे लिंगायत स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी अनेक मोर्चे वेगवेगळ्या राज्यात निघाले आहेत. मुळातच लिंगायत धर्म आणि वीरशैव यांच्या संदर्भातील उपलब्ध असलेले साहित्य, त्यावर झालेली संशोधने, त्यावरील लेखन त्यामुळे एकंदरीतच वीरशैव लिंगायत या संघर्षामध्ये  महत्त्वाचा निष्कर्ष असा निघतो की लिंगायत हा बाराव्या शतकात स्थापन झालेला एक स्वतंत्र धर्म आहे तसेच या धर्माची पहिल्या जनगणनेमध्ये स्वतंत्र नोंद आहे. कालांतराने शरणाच्या वचनामध्ये वीरशैव हे पद घुसवण्यात आले आणि ज्यांनी हे पद बसवलेले आहे  ते त्या पदाची मक्तेदारी निर्माण व्हावी, त्यांचं वर्चस्व या समाजावर राहूवे, म्हणून वीरशैव लिंगायत हा शब्द वापरला जात आहे. मुळातच लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, त्यामुळे तो एक हिंदू धर्माचा भाग नाही, हे ही आपल्याला मान्य करावाच लागते. म्हणून वीरशैव लिंगायत हे जसे पर्यावाची शब्द म्हणून सांगितले जातात त्याचाच आधार घेत आपल्याला असं म्हणता येईल की लिंगायत हा स्वतंत्र धर्म असून शरणांच्या वचनामध्ये आलेलं वीरशैव या पदाचा आधार घेत वीरशैव हे एक व्रत आहे. त्यामुळे लिंगायत स्वतंत्र धर्म ही मागणी अतिशय रास्त आहे आणि शासनस्तरावर याचा पाठपुरावा करणं ही काळाची गरज आहे कारण धर्म मागणीसाठी जे काही निकष लागतात ते सर्व निकष लिंगायत पूर्ण करतात. ह्यासाठी लिंगायतामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे गरजेचे आहे. परंतु एकंदरीतच या सगळ्या बाबींचा विचार केल्यास असे निदर्शनास येते की लिंगायत यांना हिंदुचा एक भाग म्हणायचा आणि हिंदू धर्मातून लिंगायतना कमी करणं म्हणजे हिंदूंची संख्या कमी करणे, असा त्याचा अर्थ घेतला जात आहे तसेच आज लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाल्यानंतर हिंदू समूहामध्ये असलेल्या अनेक जाती उपजाती सुद्धा स्वतंत्र धर्माची मागणी करतील ही अशी भीती काही हिंदूधर्मच्या ठेकेदारांना आहे. मुळातच हिंदू धर्माच्या बाबतीत  जे काही संस्कार आहेत, रीतीरिवाज आहेत त्या संस्कारांना रीतीरिवाजाना लिंगायतामध्ये कोणतेही स्थान नाही.त्यामुळे लिंगायत हा समतामूलक असा एक स्वतंत्र असा समाज आहे तो हिंदूचा कधीही भाग नव्हता. त्यामुळे लिंगायत या स्वतंत्र धर्मला मान्यता मिळू नये यासाठी वीरशैव आणि लिंगायत यामधील संघर्ष आणि राजकारण कसं तेवत ठेवता येईल हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज मोठ्या प्रमाणात वीरशैव लिंगायत या संदर्भात मोठे राजकारण केले जात आहे हे ही आपल्याला मान्य करावेच लागते. म्हणून वीरशैवानी आणि लिंगायतांनी संघर्षात न पडता वीरशैव आणि लिंगायत यामध्ये समन्वय साधून लिंगायत या स्वतंत्र धर्माची मागणी पुढे नेणे गरजेचे आहे.


संदर्भ:

1.करडीगुद्दी.आर.एम, लिंगायत तत्वज्ञान व आचरण,महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान भालकी जि.बिदर

2.जुबरे राजू ( संपा), लिंगायत स्वतंत्र धर्म, महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान भालकी जि.बिदर

3.बिचेवार सचितानंद,लिंगायत ऐतिहासिक मागोवा,महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान भालकी जि.बिदर

4.मेनकुदळे अशोक, क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर,महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान भालकी जि.बिदर

5.मेनकुदळे अशोक,समतासूर्य महात्मा बसवेश्वर,महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान भालकी जि.बिदर

6.लिगाडे जयदेवीताई, बसवदर्शन,महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान भालकी जि.बिदर

7.https://vishwakosh.marathi.gov.in/23990/

8.https://www.bbc.com/hindi/india-43492815

9.https://lingayatreligion.com/Hindi/LingayatDharama.htm

10.https://lingayatreligion.com/Hindi/Lingayat-dharma-stapaka.htm

11.https://hi.unionpedia.org 

(अधिक माहितीसाठी महाराष्ट्र बसव परिषद हिरेमठ संस्थान भालकी यांनी प्रकाशित केलेलं  संदर्भ ग्रंथ वाचा)


(लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)










 


 




 



 




 


 


 



 



Wednesday, November 18, 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (१००% टक्के राज्य पुरस्कृत)







भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि या कृषिप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांना योग्य त्या सोयी-सुविधा पुरवणे गरजेचे ठरते. तरच  शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. म्हणूनच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावरून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून कृषि योजनांच्या माध्यमातून सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या कृषि भागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. एकंदरीतच राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची आणि  अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांची स्थिती ही सन्मानजनक  नाही. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्या  शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर्जा हा समाधानकारक स्वरूपाचा नाही व त्यांच्याकडील जमिनी ह्या कोरडवाहू स्वरूपाच्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साधनसुविधा पाहता अत्यंत तोडक्या स्वरूपाच्या आहेत. म्हणून त्यांच्या शेतीचा दर्जा  सुधारून उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. म्हणूनच ह्या उत्पन्नवाढीसाठी शेतीचे आधुनिकीकरण व सिंचनाच्या शाश्वत सोयीसुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.   त्यासाठी शासनस्तरावर वेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जातात. त्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या  योजनेची माहिती त्यांना होणे  गरजेचे आहे.





डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना (१००% टक्के राज्य पुरस्कृत)

 

उद्देश :

राज्यातील अनुसुचित जाती /नवबौध्द प्रवर्गातील शेतक-यांना सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण करणे.

योजनेची व्याप्ती राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व 34 जिल्हयांमध्ये सदर योजना राबविण्यात येत आहे.

अनुसुचित जाती /नवबौध्द प्रवर्गातील शेतकरी यांना देण्यात येणारे अनुदान -

1) नवीन विहीर -  रु.२५००००/-

 2) जुनी विहीर दुरुस्ती -  रु.५००००/-

 ३) इनवेल बोअरींग - रु.२००००/-

 ४) पंप संच (डीझेल/विद्युत)- रु.२००००/-

 ५) वीज जोडणी आकार - रु.१००००/-

 ६) शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण - रु.१०००००/-

 ७) सुक्ष्म सिंचन संच - ठिबक सिंचन संच रु.५००००/- ,  तुषार सिंचन संच - रु.25०००/-

 

सदर योजनेंतर्गत वरील ७ बाबींचा समावेश असून लाभ पॅकेज स्वरुपात देण्यात येईल. खालील ३ पैकी कोणत्याही एकाच पॅकेजचा लाभ लाभार्थीस देय आहे.

1.   नवीन विहीर पॅकेज -

नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.

2.   जुनी  विहीर दुरुस्ती पॅकेज -

जुनी विहीर दुरुस्ती, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच व आवश्यकतेनुसार इनवेल बोअरींग.

3.    शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज -

शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व पंप संच.

4.     ज्या शेतक-यांनी यापुर्वीच योजनेतुन/स्वखर्चातून विहीर घेतली असेल त्यांना वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच, पंप संच यासाठी अनुदान अनुज्ञेय आहे.

5.     वरील घटकांपैकी काही घटक शेतकरी यांचेकडे उपलब्ध असतील तर उर्वरीत आवश्यक घटकांचा लाभ घेण्यासाठी खालील घटकांची निवड करावी.

     वीज जोडणी आकार, सुक्ष्म सिंचन संच व पंप संच

पुर्वसंमती - 

पुर्वसंमती मिळाल्यानंतरच शेतकरी यांनी वरील बाबींची अंमलबजावणी करावयाची आहे.

लाभार्थी पात्रता -

1. लाभार्थी अनुसुचित जाती / नवबौध्द  प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.

2. शेतकरी यांचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक  उत्पन्न रु.१५००००/- पेक्षा जास्त नसावे.

     ३. नवीन विहीरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकरी यांचेकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे

         आवश्यक आहे. तसेच यापुर्वी अन्य कोणत्याही योजनेतून नवीन विहीरीचा लाभ घेतलेला नसावा.

४. लाभार्थ्याच्या  7/12 वर तसेच शेतात प्रत्यक्ष विहीर असल्यास नवीन विहीर लाभ घेता येणार नाही.

५. नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून ५०० फुटाचे अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी.

६. नवीन विहीर व्यतिरिक्त अन्य बाबींचा लाभ घेण्यासाठी किमान ०.२० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे -

१.     ७/१२

२.     ८ अ

३.     आधार कार्ड

४.     तहसीलदार यांचेकडील उत्पन्नाचा दाखला

५.    नवीन विहीरीचे बाबतीत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला असणे आवश्यक आहे.

६.    जात प्रमाणपत्र.

 अर्ज कोठे करावा -

अर्ज www.agriwell.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आनलाईन करावा. सदर सुविधा

साधारणपणे प्रत्येक वर्षी आगस्ट/सप्टेंबर मध्ये एक महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन

देण्यात येते.

नवीन विहीर -

पुर्वसंमती व कार्यारंभ आदेश -

नवीन विहीरीसाठी लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर कृषि अधिकारी पंचायत समिती हे कार्यारंभ आदेश  देतील. त्यानंतर ३० दिवसाचे आत काम सुरु करावे.

 शेततळे अस्तरीकरण -

शेततळे अस्तरीकरणासाठी ५०० मायक्रान जाडीची प्लास्टिक रिईनफोर्स्ड एचडीपीई जिओ

मेंबरेन फिल्म (IS:15351:2015 Type II) वापरावी.

ठिबक सिंचन संच -

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान व या योजनेतुन ३५ टक्के (रु.५००००/-   मर्यादेत) अनुदान असे ९० टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहील.

तुषार सिंचन संच -

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून ५५ टक्के अनुदान व या योजनेतुन ३५ टक्के (रु.२५०००/-  मर्यादेत) अनुदान असे ९० टक्के अनुदान लाभार्थ्याला देय राहील.

पंप संच -

पुर्वसंमती मिळाल्यानंतर लाभार्थी यांनी एक महिन्याच्या आत पंप संच बाजारातील अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करावा.

अनुदान -

देय अनुदान इलेक्ट्रानिक फंड ट्रान्सफरव्दारे लाभार्थींचे आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येईल.

 


 

अधिक माहितीसाठी संपर्क -

कृषि अधिकारी पंचायत समिती, 

गट विकास अधिकारी,पंचायत समिती  

कृषि विकास अधिकारी,जिल्हा परिषद.

 

( योजना http://krushi-vibhag.blogspot.com वरून साभार)

Monday, November 16, 2020

मतदार वर्तन आणि पदवीधर व शिक्षकांच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया

 मतदार वर्तन आणि पदवीधर व शिक्षकांच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया


भारताच्या लोकशाही आणि संवैधानिक व्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणजेच निवडणुका होय. निवडणुकातील सगळ्यात मोठा घटक म्हणजेच मतदान होय.मतदान हा लोकशाहीतील आपला सर्वात मोठा हक्क आणि शांततामय मार्गानं परिवर्तन करण्याचं साधन आहे.परंतु या हक्काची  ताकद आजही काही मतदारांना समजली नाही.  परंतु आपण लोकशाहीत वावरत असल्यामुळे शासनाकडून सुशासनाची अपेक्षा करतो पण आपल्याकडील ग्रामपातळीपासून ते देशपातळीपर्यंत होणाऱ्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहता आपल्याकडे मतदान करण्याची संकल्पना योग्य प्रमाणात रुजलेली नाही.यामुळेच ग्रामपातळीपासून देशपातळीपर्यंतच्या प्रशासनात  सर्वांचा वाटा दिसत नाही  त्यामुळे आपल्याकडे शासनात सर्वांचे प्रतिबिंब दिसत नाही. त्यामुळे भारतीय लोकशाहीत  अनेक चुकीचे उमेदवार निवडून येतात याचा विचार आपण करणं गरजेचे ठरते. कारण आपल्या देशातील बहुतेक मतदार असे आहेत जे केवळ मत देण्यासाठी जातात, त्यांना मत कोणास द्यायचे आहे, मतदान का करायचे आहे,मतदान का आवश्यक आहे, ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे मतदानाचा सारासार विचार आपल्याकडे होत नाही. परंतु आपल्याकडे बहुसंख्य  मतदारांना मतदानाचा अधिकार कसा वापरायचा हे ही माहित नसले तरी ही आपल्याकडील मतदान करणारे मतदार हे सुज्ञ व जागृत आहेत ते शांततामय मार्गाने परिवर्तन घडवून आणतात हेच आपल्या लोकशाहीच यश म्हणावे लागते  त्यामुळे भारताला निवडणुकांचा देश असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

    आपल्याकडे आज वेगवेगळ्या प्रकारचे मतदान करणारे मतदार आपल्याला दिसून येतात.त्यामध्ये राजकीय पक्षाची हवा पाहून आपलं मतदान वाया जाऊ नये या उद्देशाने मतदान करणारा मतदार, स्थानिक पार्श्वभूमी व स्थानिक प्रश्नांची जाण असणारा उमेदवार म्हणून मतदान करणारे मतदार, जात, धर्म भावकी, सोयरे धायरे, जवळचा उमेदवार, म्हणजेच तुम्ही कुर्मी असाल तर तुम्ही कुर्मीला मतदान करता, जर यादव  असाल तर यादवांना  मतदान करता, मुस्लिम असल्यास मुस्लिम उमेदवारास मतदान करता, मराठा असाल तर मराठा उमेदवारास मतदान करता, अनुसूचित जाती व जमातीचे असल्यास त्याच उमेदवाराला मतदान करायचे, व हे करतानाच आपल्या जातीचा उमेदवार निवडत असताना सुद्धा त्यात हलका आणि भारी पाहून मतदान करणारे ही मतदार आपल्याकडे आहेत, तसेच माध्यमांच्या प्रभावाखाली व माध्यमांच्या प्रभावाचा विचार करून मतदान करणारे मतदार, घरच्यांनी सांगितले ह्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मतदान करणारे मतदार, कोणत्याही निवडणुकीत कधीच मतदान न करणारे मतदार, आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पैशाची, पार्ट्यांची देवाण-घेवाण करून मतदार करणारे मतदार, आणि इतर पद्धतीने मतदान करणारे मतदार व सगळ्यात महत्वाचे म्हणजे विकासाला भर देणारा ही मतदार आपल्याकडे आहे पण पर्यायाने त्यांची संख्या कमी आहे,म्हणजेच आपल्याकडे बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा मतदार आढळून येतो, त्यामुळे आपल्याकडे सुशासनाची संकल्पना ही प्रभावीपणे रुजल्या गेली नाही हे वास्तव आहे. त्यामुळे अनेक समाजांचे,तरुणांचे सुशिक्षितांचे, शेतकऱ्यांचे,व इतर सर्वांचे प्रश्न अद्यापही सुटू शकले नाहीत.

    ज्या प्रमाणात सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी सभागृहात असतात त्याचप्रमाणे सुशिक्षित लोकांचे प्रतिनिधित्व करणारे हे प्रतिनिधी सभागृहात सुशिक्षित मतदार निवडून देतात, त्यामध्ये पदवीधरांचे आमदार, शिक्षकांचे आमदार हे सुशिक्षित लोकांचे आमदार म्हणून सुशिक्षितांचे प्रतिनिधित्व करतात, एकंदरीत सर्वसामान्य लोकांचा मतदानाकडे पाहण्याचा जो कल आहे तोच सुशिक्षितांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतो, त्यामुळे त्यामुळे आजही शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रश्न या राज्यात सुटू शकलेले नाहीत,पदवीधरांच्या आणि शिक्षकांच्या मतदारसंघात पूर्वी पदवीधर आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सभागृहामध्ये निवडून जायचे परंतु कालांतराने या ही मतदारसंघांवर राजकीय पक्षांनी आक्रमण केले,त्यामुळे पदवीधरांच्या, शिक्षकांच्या संघटना आता मागे पडून राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हे सुशिक्षितांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी सरसावले आहेत, परंतु राजकीय पक्षाचे प्रतिनिधी निवडून दिल्याने हे प्रतिनिधी शिक्षकांचे व पदवीधरांचे कधीही होत नाहीत तर ते राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात,ते राजकीय पक्षांचा अजेंडा राबवतात आणि त्याच राजकीय पक्षाच्या अजेंड्याला पदवीधरांना आणि शिक्षकांना बांधण्याचं काम ह्या निवडणुका व लोकप्रतिनिधी करताना दिसून येतात.एकंदरीतच सर्वसामान्यांच्या निवडणुका आणि सुशिक्षितांच्या निवडणुका ह्यांचा आपण विचार केला तर ह्यांच्या निवडणुकीची व निवडणुकीत मतदान करण्याची पद्धत ही वेगळ्या प्रकारची आहे. सर्वसामान्यांच्या निवडणुका ह्या आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने ईव्हीएम मशीनद्वारे व उमेदवारांना मिळालेल्या चिन्हाच्या आधारे होत आहेत, पण सुशिक्षितांच्या निवडणुका मात्र बॅलेट पेपरच्या माध्यमातून होताना दिसतात.

     पदवीधर व शिक्षकांच्या होणाऱ्या ह्या निवडणुकांना एकल संक्रमण मतदान पद्धती असे म्हणतात. एकल संक्रमण पद्धतीमध्ये निवडणुकीत एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे मतदार पसंतीच्या क्रमवारीत मतदान करतात. म्हणजेच मतदार मतपत्रिकेमध्ये उमेदवारांच्या नावासमोर आपला पसंतीचा क्रम लिहितो.या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या सर्व वैधमतांचा व  निवडून द्यावयाच्या प्रतिनिधींचा विचार करून निवडून येण्यासाठी मतदानाचा कोटा ठरवला जातो.साहजिकच मताचा कोटा  पूर्ण करणारा  व आवश्यक मते मिळवणारा उमेदवार निवडून येतो. तसेच मताचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे इतर उमेदवारांची मते विभागली जातात व निवडून येण्याचा कोटा पूर्ण केला जातो. म्हणूनच या पद्धतीला एकल संक्रामण मत पद्धती किंवा सिंगल ट्रान्सफरेबल व्होट असे देखील म्हटल्या जाते. एकंदरीतच ही मतदानाची पद्धती अतिशय किचकट स्वरूपाची असल्यामुळे या पद्धतीत मतमोजणीस वेळ लागतो,म्हणूनच ही मतदानाची आणि मतमोजणीची पद्धती बदलली पाहिजे असे अनेकांना वाटते.

    त्यामुळे ह्या मतदानाची आणि मतमोजणीची प्रक्रिया पाहता निवडणुकीत बाद होणार्‍या मतांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपले मत योग्य पद्धतीने नोंदवणे व मतदान बाद होऊ नये याकरिता सुशिक्षितांच्या मतदान प्रक्रियेमध्ये सुशिक्षितांनी कोणत्या पद्धतीने मतदान करावं याची जागृती मोठ्या प्रमाणात करावी लागते, कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये नवमतदारांचा वाटा मोठा असतो, नवमतदार प्रथमच एकल संक्रमण पद्धतीने मतदान करतात त्यामुळे त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात साशंकता निर्माण झालेली असते, त्यामुळे नवमतदारांनी व जुन्या मतदारांनी या निवडणुकीत मतदान कोणत्या प्रकारे करावे व आपले मत बाद  होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.म्हणून पदवीधर व शिक्षकांच्या  निवडणुकीत मतदान करणाऱ्यां मतदारांनी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.


  1. केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळा शाईचा स्केच पेननेच मत नोंदवावे इतर कोणत्याही पेन-पेन्सिल, बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये.

  2. तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर '1' हा अंक लिहून पसंतीक्रम नोंदवावा.

  3. निवडून द्यायच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जेवढे उमेदवार आहेत तेवढे  पसंती क्रमांक आपण  देऊ शकतात.

  4. आपले इतर पसंती क्रमांक उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर 2,3,4,5,6------20 असे नोंदवू शकतात.

  5. एका उमेदवाराच्या नावासमोर एकच पसंती क्रमांक द्या, ज्या उमेदवारांच्या नावापुढे आपण पसंती क्रमांक दिला असेल तोच पसंती क्रमांक इतर उमेदवाराच्या पुढे नोंदवू नका.

  6. पसंती क्रमांक हे 1,2,3,4 ह्याच पद्धतीने नोंदवावे.पसंती क्रमांक एक-दोन-तीन असे शब्दात लिहू नयेत.

  7. पसंतीक्रम नोंदवताना वापरायचे अंक हे भारतीय अंकाच्या अंतराष्ट्रीय स्वरूपात 1,2,3, असे असावे किंवा रोमन अंकात I,Il,III ह्या पद्धतीने नोंदवावे किंवा मराठी भाषेत देवनागरी लिपीत १,२,३,४ असे नोंदवावेत.

  8. मतपत्रिकेत कोठेही आपले नाव, स्वाक्षरी, अद्यअक्षरे किंवा इतर कोणतेही शब्द नोंदवू नयेत, तसेच कुठेही अंगठ्याचा ठसा उमटवू नये.

  9. मतपत्रिकेवर मत नोंदवताना   X अशी कोणतीही खून करू नये.

  10. आपली मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर पहिल्या पसंतीचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. अन्य पसंती क्रमांक नोंदवणे हे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.

  (अधिक माहितीसाठी डाऊनलोड करा)


निवडणूक आयोगाने वरील नेमून दिलेल्या नियमाच्या व्यतिरिक्त पद्धतीने आपण जर मतदान केले तर ते मतदान बाद होते, म्हणून वरील नियमानुसारच प्रत्येक पदवीधरांनी व शिक्षकांनी मतदान करणे गरजेचे आहे.

    एकंदरीतच भारतीय मतदारांचे वर्तन पाहता भारतीय मतदार हा वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करताना आपल्याला दिसून येतो. त्याला सुशिक्षित, पदवीधर व शिक्षकही अपवाद नाहीत. त्यामुळे भारतीय मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे गरजेचे आहे. कारण भारतीय लोकशाहीत समतेचे बीज रुजवण्यासाठी सर्वसामान्य मतदार, पदवीधर मतदार, शिक्षक मतदार जागृत असणे गरजेचे आहे.त्यामुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षकांच्या निवडणुकीत प्रत्येक पदवीधरांनी व शिक्षकांनी जागृत होऊन आपल्या विवेकबुद्धीने मतदान करून लोकशाही बळकट व सक्षम करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न सुटतील.

.



( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)

Wednesday, November 11, 2020

कायद्यापुढे खरेच सर्व समान आहेत का….?

 कायद्यापुढे खरेच सर्व समान आहेत का….?

गेल्या काही दिवसांपासून  रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये अटक झाल्यामुळे देशपातळीवर हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजल्याचे आपल्याला दिसून येते. कारण एखाद्या पत्रकाराला अटक झाल्यानंतर देशाच्या गृहमंत्र्यापासून तर देशातील वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, तसेच अनेक केंद्रीय मंत्र्यांनी ह्या अटकेचा विरोध केल्याचे आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपालानी ह्या प्रकरणावरून राज्याच्या गृहमंत्र्यांना फोन करून अर्णब गोस्वामीची काळजी घेण्याची विनंती केली त्यावरून हे प्रकरण किती हायप्रोफाईल आहे हे आपल्याला दिसून येते. एकंदरीतच अर्णव गोस्वामी यांना पत्रकारितेच्या प्रकरणांमध्ये अटक झालेली नसतानाही त्या अटकेचा पत्रकारितेशी सहसंबंध जोडुन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांवर हल्ला झाला ही टीका देशातील प्रमुख जबाबदार लोकांनी केल्यामुळे पत्रकारितेच्या आड लपून राजकीय उद्देश साध्य करण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच ही अटक कशी बेकायदेशीर आहे हे ही दाखवण्याचा प्रयत्न करून राज्य सरकार रजकिय द्वेषाने कारवाई करत आहे हा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला. मुळातच आत्महत्येच्या या प्रकरणात सेशन कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली असताना उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला व तो जामीन अर्ज उच्च न्यायालयाने अटकेच्या समर्थनाची कारणे देऊन फेटाळल्यामुळे अर्णब गोस्वामीला सर्वोच्च न्यायालयात जावे लागले.एकंदरीतच सर्व प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्वोच्च न्यायालयाने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला असतानाच ह्या निकालाचे काही राजकीय पक्षांकडून स्वागत होताना आपल्याला दिसून येते.पण सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालावरून  समाज माध्यमात ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या त्यावरुन हे प्रकरण किती महत्त्वाचं व गंभीर आहे हे आपल्या लक्षात येते.

   या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण पाहता "व्यक्तीस्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असल्याचं म्हणत ही व्यक्ती कोण आहे. त्याचे विचार तुम्हाला आवडतात की नाही, हे विसरून जा मी स्वतः त्यांचं चॅनेल पाहत नाही. पण, आमच्याकडे एक नागरिक आला आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक नागरिकाच्या अधिकाराचं रक्षण करायचं आहे," असं न्या. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे हे निरीक्षण महत्त्वाचे असल्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा हा सर्वांना लागू होतो ही वस्तुस्थिती असतानाच काही जणांच्या बाबतीत मात्र व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लागू होत नाही का ? असा प्रश्न समाजात विचारला जाऊ लागला आहे. त्यातूनच अर्णब गोस्वामीप्रमाणेच इतर  लोकांचीही देखील सुटका व्हावी अशी मागणी पुढे येत  आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली काही निरीक्षणे पाहताअर्णब गोस्वामींना जामीन न देऊन मुंबई उच्च न्यायालयाने चूक केली असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्याचसोबत FIR खरा मानला आणि चौकशीचा भाग असला,तरी पैसे न देणं हा आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा कसा?आज कोर्टाने हस्तक्षेप केला नाही तर आपण विनाशाच्या दिशेने जाऊ ही निरिक्षणे नोंदवली असतानाच सेशन्स कोर्टाला जामीनाबाबत निर्णय घेऊ देने अपेक्षित असतानाच कोर्टाच्या पदानुक्रमाला धक्का  लावण्याचे काम  ह्या निकालाने झाले आहे. म्हणजेच आत्महत्येला प्रवृत्त करणं हा गुन्हा नाही हे सर्वोच्च न्यायालयाने याठिकाणी मान्य केल्याचे दिसून येते, खरोखरच एखादी व्यक्ती आत्महत्या पर्यंत का जाऊ शकते? याचा विचार सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणातून होत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच ज्या प्रमाणात आरोपींना व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार आहे त्याच प्रमाणात फिर्यादीला ही व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असतानाही त्या अधिकाराची काही प्रमाणात गळचेपी झाल्याचे आपल्याला दिसून येते, एकंदरीतच उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेला निकाल हा सापेक्ष स्वरूपाचा असून तो कनिष्ठ न्यायालयाच्या मर्यादेचे उल्लंघन करणारा नव्हता, त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निकालावरून लोकांचा न्यायालयीन प्रक्रिये वरील विश्वास वाढला होता. पण याच प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ज्या काही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत त्यावरून सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा संशयाच्या फेऱ्यात अडकल्याचे आपल्याला दिसून येते.

   कारण अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर होणाऱ्या तात्काळ सुनावणीने वाद निर्माण झालाय. वरिष्ठ वकील आणि सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष दुष्यंत दवे यांनी याबाबत नाराजी ही व्यक्त केली आहे.कारण अर्णब गोस्वामी यांची याचिका दाखल झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यावर सुनावणी कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.कारण अशा प्रकारच्या इतर याचिका सुनावणीसाठी येण्यास वेळ लागतो. पण, गोस्वामी यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी होते  हे ही संशायास्पद आहे, कारण अर्णब गोस्वामी हे प्रकरण हायप्रोफाईल या प्रकारात मोडल्या गेले. एकंदरीतच कायद्यापुढे सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेतील कलम याठिकाणी कोठेतरी लवचिक होताना दिसून येते. कारण सर्वसामान्य व्यक्तीच्या संदर्भात कायद्यापुढे समान हे तत्त्व स्वीकारले जाते पण हायप्रोफाइलच्या प्रकरणात या तत्वाला कुठेतरी हरताळ फासला जातोय हे ही या निकालावरून दिसून येते. कारण सर्वसामान्य व्यक्ती कनिष्ठ न्यायालयातच लढा देऊ शकत नाही तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्या कधी जातील, सर्वसामान्यांसाठी सर्वोच्च न्यायालय हायप्रोफाईल होईल का? हे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडू लागलेले आहेत. उच्च न्यायालयाने मॅजिस्ट्रेटने फिर्यादी पक्षाला नोटीस न काढता अ-समरी अहवाल मंजूर केला. पोलिसांनी कोर्टाला माहिती देऊन पुन्हा चौकशी सुरू केली. त्यामुळे अटक अवैध म्हणता येणार नाही असे निरीक्षण नोंदवूनही सर्वोच्च न्यायालय फक्त व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काला बाधा येते म्हणून जर हायप्रोफाईल प्रकरणात जर हस्तक्षेप करून न्याय-निवाडा करणार असेल तर समाजात इथून पुढे अशा अनेक घटना घडतील, त्यामुळे आरोपींना न्याय मिळेल पण फिर्यादीने न्याय मिळणार नाही. त्यामुळे आरोपींचे मनोधैर्य वाढवणारा हा निकाल असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे कायदा हा सर्वांसाठी समान असला तरी सर्वसामान्यांसाठी तो समान राहीलच याची शाश्‍वती देता येत नाही. कारण प्रत्येकाच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही सर्वोच्च न्यायालयाची असताना एकाला न्याय व दुसर्‍यावर अन्याय करणारा न्याय प्रत्येकाच्या अधिकाराचे कसं संरक्षण करू शकतो हे ही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करून सांगणे आवश्यक ठरते. कारण येथील उच्च न्यायालय एक निर्णय देतात, सर्वोच्च न्यायालय दुसरा निर्णय देतात म्हणजेच न्यायालयीन प्रक्रिया ही एक सारख्या स्वरूपाची राहिलेली नाही हे ही निश्चित आहे. त्यामुळे कायद्यापुढे सर्व समान हे तत्त्व सांगणारी भारतीय राज्यघटना काळाच्या ओघात मूठभर सत्ताधा-यांच्या हातात असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे कायद्यापुढे खरेच सर्व समान आहेत का हाच प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावतो, ह्याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल अशी अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही.


( फोटो: लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)


मोदीची गॅरंटी ; तरीही भाजपा समोर आव्हानच……

  मोदीची गॅरंटी ; तरीही  भाजपा समोर  आव्हानच…… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली असली तरीही, ...