स्थानिक निवडणुका ; नवीन राजकारणाची दिशा
शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थां महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपलं वर्चस्व आणि अस्तित्व हे टिकावे आणि कायम राहावं याच दृष्टिकोनातून सर्वच राजकारणी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थात आपल्याला ही संधी मिळावी या हेतूने अनेक जण प्रयत्न करताना दिसतात,त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था या खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रथम पाठशाळा ठरतात कारण याच निवडणुकांच्या माध्यमातून देशपातळीवर व राज्य पातळीवर अनेक नेते पुढे आले आहेत व त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा ठसा देशपातळीवर आणि राज्य राजकारणावर पाडलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्थानिक निवडणुका ह्या नवीन राजकारणाची दिशा ठरवताना दिसून येतात.राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळपास 14000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू झालेल्या आहेत.तसेच सध्या राज्यात काही महानगरपालिकांच्या आणि नगरपालिकांच्या कालावधी संपला आहे.पण कोरोणाच्या संकटामुळे त्यांच्यावर प्रशासक आहेत.पण सध्याची कोरणाची पार्श्वभूमी पाहता राज्यात सध्या कोरोणाचा कहर काही प्रमाणात कमी झाल्यामुळे राजकीय प्रक्रियेला वेग आलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या नगरपरिषद आणि महानगरपालिकाच्या मुदती संपल्या त्यांच्याही निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच घोषित होईल अशी आशा आहे.
एकंदरीतच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जर स्वरूप पाहिले तर कोणत्या ना कोणत्या भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सुरूच राहतात,आणि त्या निवडणुका खऱ्या अर्थाने ह्या राज्याच्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकाचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसून येतात.कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभेचे चित्र हे सामावलेलं असतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या विधानसभेच्या निवडणुकांची रंगीत तालीम असते आणि त्यामुळे ज्यांचा विधानसभेवर डोळा आहे असे भावी आमदार, तसेच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आणि त्या भागाचे आमदार आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत करताना दिसून येतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने आमदारांना, खासदारांना जिंकवणाऱ्या ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात.त्यामुळे आमदार खासदारांच्या निवडणुकीत जे कार्यकर्ते आपला जीव ओतून काम करून आमदार खासदारांना निवडून आणतात त्या आमदार खासदारांचे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणने कर्तव्य ठरतं त्यामुळे आमदार-खासदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष घालतात.त्यामुळे देशाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपेक्षाही सगळ्यात अवघड असणारी निवडणूक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाकडे पाहिल्या जाते. त्यामुळे एक वेळ आमदार होता येईल पण ग्रामपंचायतीचा सदस्य होता येईल याची शाश्वती देता येत नाही, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुका ह्या अत्यंत संघर्षमय व रहस्यमय वातावरणात पार पडताना आपल्याला दिसून येतात.
एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात बेरजेच्या राजकारणातून तयार झालेलं महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. तर विरोधी पक्ष म्हणून प्रबळ असा भाजप सध्या काम करताना आपल्याला दिसून येतो.त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा हीच लढाई खऱ्या अर्थाने आपल्याला पाहावयास मिळणार आहे. त्याची झलक आपल्याला राज्यात झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहण्यास मिळाली.या निवडणुकीत महाविकास आघाडी एकजुटीने लढली तसेच भाजपही त्याच ताकतीने लढला पण महाविकास आघाडीच्या ताकदीपुढे भाजपची ताकद ही पोहोचू शकली नाही त्यामुळे भाजपाचे पारंपारिक बालेकिल्ले या निवडणुकीत भाजपच्या हातून निसटले त्यामुळे भाजपही आता होऊ घातलेल्या व येणाऱ्या निवडणुका तोंड पोळल्यामुळे ताकही फुंकून पिऊन ह्या निवडणुका लढणार यातही शंका नाही.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत मिळालेले यश आणि एकजूट पाहता सध्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही एकत्र लढू अशी घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली असल्यामुळे आघाडीतील घटक पक्षांच्या भावी आणि भाजपच्या तंबूत काहीप्रमाणात अस्वस्था पसरलेली असली तरी भाजपाकडून येणाऱ्या सर्व निवडणुका या स्वबळावरच लढल्या जातील अशी आत्मविश्वासाची घोषणा करण्यात आलेली आहे.सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये निवडणुका लढण्याचे आणि जिंकण्याचे तंत्र फक्त भाजपाकडे आहे, पण भाजपकडे अति आत्मविश्वासही आहे त्याच आत्मविश्वासाचा फटका भाजपला पदवीधरांच्या निवडणुकीत बसला. त्यामुळे भाजपचे नेते आता पाठीमागे झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून वागत आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सध्यातरी भाजप स्वबळावर लढणार असल्यामुळे भाजपाकडे सर्वाधिक जागा उपलब्ध आहेत. त्यामानाने महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटपाची कोणतीही चर्चा होत नसल्यामुळे व कोण नेमक्या किती जागा लढणार याचं गणितही अद्यापही सुटलेले नाही त्यामुळे महाविकास आघाडीच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जागेचा प्रश्न सोडवणं हा सगळ्यात मोठा प्रश्न महाविकास आघाडी पुढे उभा आहे.
एकंदरीतच महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपाची स्थानिक स्वराज्य संस्थांताच्या निवडणुकीतील विजयाचा सरासरी दर पाहिली तरी सध्या तरी भाजप पुढे असला तरी सुद्धा त्याच तोडीस तोड हे इतरही पक्ष वेगवेगळ्या पॉकेटमध्ये प्रभावशाली आहेत हे ही भाजपाला माहित आहे.एकंदरीतच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळातील आणि महायुतीच्या काळातील जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण पाहिल्या तर हे पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढलेले आपणास दिसून येतात. म्हणजेच देशपातळीवरील व राज्य पातळीवरील निवडणुकात यांची आघाडी युती कायम राहते, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती आघाडी कायम राहत नाही ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते कितीही ठामपणाने सांगत असतील की आम्ही येणाऱ्या निवडणुका एकत्र लढू पण वरून हा प्रयोग त्यांना सोपा वाटतो पण प्रत्यक्षात मात्र हे खूप अवघड असल्याचं आपल्याला दिसून येते.कारण राज्य पातळीवरच्या निवडणुकांचा अनुभव पाहता वरून आघाडी जरी झाली तरी खालच्या पातळीवर ती आघाडी मानल्या जाईलच याची शाश्वती देता येत नाही त्याचा फटका शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत बसल्याचा आपल्याला पाहावयास मिळते. कारण त्या त्या भागातील प्रभावशाली नेते आपलं वर्चस्व आघाडी आणि युतीच्या नादाला लागून संपवु पहात नाहीत परिणामी हे आघाडी युतीचे काम करणार नाहीत पण बंडखोरी मात्र नक्कीच करतात ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्या बंडखोरीच्या माध्यमातून आघाडी युतीला त्याचा फटका बसतो पर्यायानं आघाडी युतीचा उमेदवार बंडखोरीच्या नादातून पाडल्या जातो परिणामी विरोधातला उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचे कसब या ठिकाणी पूर्णपणे पार पाडल्या जाते. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीच्या सर्व निवडणुका एकत्र लढवण्याच्या विधानांवर महाविकास आघाडी नक्कीच विचार करत असणार यात मात्र शंका नाही. कारण एकत्र निवडणुका लढविण्याचा सर्वाधिक फायदा व फटका हा महाविकास आघाडीला बसणार आहे. कारण सध्या महाविकास आघाडीकडे तीन पक्षाचा एकत्र आलेला ओढा पाहता महाविकास आघाडीत कोणत्या घटक पक्षाला थांबवायचं, कोणाला पुढे आणायचं, पक्षातील कोणत्या कार्यकर्त्यांना थांबवायचं हाच सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहणार आहे.
तसेच येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या स्वबळावर लढण्याच्या भाजपाच्या घोषणेमुळे भाजपात सध्या मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण असल्याचे दिसून येत आहे,भाजपालाही महाविकास आघाडीने एकत्र लढलं पाहिजे असेच वाटते, कारण महाविकास आघाडी एकत्र लढ्यामुळे सर्वाधिक फायदा हा भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण महाविकास आघाडीतील नाराज कार्यकर्त्यांची फौज भाजपा आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी आपले दार उघडे करून बसलेलाच आहे हे ही वास्तव आहे. त्यामुळे भाजप कितीही स्वबळाची भाषा करत असला तरी मात्र भाजपची सर्व मदार ही महाविकास आघाडीच्या एकत्र निवडणुका लढवण्याच्या मुद्यावरच भाजपचे स्वबळाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
तीन मोठे पक्ष एकत्र असणं ही महाविकास आघाडीची सध्याची जमेची बाजू असली तरी कागदावरची बाजू ही भक्कम असली तरी मैदानातील बाजू ह्याचे चित्र नक्कीच वेगळे राहणार. कारण प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवणं हा गरजेच आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पक्ष वाढवण्याचा साधंन ठरतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे एकत्र असणं हे पक्षवाढीसाठी एक मोठी अडचण निर्माण होऊ शकते हे ही तेवढेच खरे आहे. कारण प्रत्येक पक्षाला जागेच्या मर्यादा पडणार हे ही खरेच आहे.त्यामुळे पक्षवाढ हा मुद्दा लक्षात घेता तेव्हा प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी नक्कीच प्रयत्न करणार त्यावेळी तडजोड करावी लागणार त्यावेळी तडजोड कोण स्वीकारणार व कमी जागा कोण घेणार हा प्रश्न उभा राहतो अशावेळी प्रतिष्ठेचा व अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे नेते अशा प्रकारची आघाडी होऊ देतील का हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सध्या तरी स्थानिक राजकारणाचा विचार करता ह्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होईल का याबाबत मात्र नक्कीच शंका आहेत. महाविकास आघाडीच्या एकत्र लढण्यामुळे भाजप स्वबळाचे स्वप्न जरी साकार होणार असले तरी मिळणारे यश हे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर अवलंबून असणार आहे.कारण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आल्यास भाजपसमोरील आव्हानेही वाढत जातील यात मात्र शंका नाही तरीसुद्धा महाविकास आघाडी पुढं सगळ्यात मोठे आव्हान आहे ते म्हणजे जागावाटपाचे आणि पक्षवाढीचे त्यामुळे महाविकास आघाडी येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्र लढवणार का वेगवेगळ्या लढवणार यावरच महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या राज्याच्या राजकारणाची दिशा निश्चित करणाऱ्या राहतील,म्हणून स्थानिक निवडणुका राज्याच्या राजकारणाची नवी दिशा ठरवणार्या राहणार आहेत.
( लेखातील फोटो गुगल वरून साभार)









