https://www.google.com/adsense/new/u/0/pub-4475133060821869/sites/detail/url=bkilche.blogspot.com चौफेर : February 2021
animated-fireworks-image-0061 animated-rose-image-0045चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे animated-rose-image-0045 मी कोणाला शिकवत नाही मी फक्त ते शिकू शकतील असे वातावरण देतो” - अल्बर्ट आईन्स्टाईन 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत आहे 💐💐💐💐 चौफेर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद💐💐💐💐 animated-bird-image-0155 -image-1310" />

Saturday, February 20, 2021

गुरूंचे गुरुत्व हा व्यक्तीमत्त्वाचा आरसा.....

 गुरूंचे गुरुत्व हा  व्यक्तीमत्त्वाचा आरसा......




गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु,

गुरु देवो महेश्वरा,

गुरु साक्षात परब्रह्म,

तस्मै श्री गुरुवे नमः



गुरूंचा महिमा सांगणारी आणि गुरूं शिष्य  नात्याची जोपासना करणाऱ्या भारतीय संस्कृतीत गुरूला अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्याने ती परंपरा आणि महिमा शिक्षकी पेशात असणाऱ्या डॉ. गंगाधर वाळले लिखित गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती जपताना दिसून येते. शिक्षकांनी घेतलेली जबाबदारी खरोखरच शिक्षकांना समजली आहे का? आणि त्यांची  जाणीव त्यांना आहे का?  ह्या प्रश्नाची उकल करणारी ही साहित्यकृती नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ह्या साहित्यकृतीद्वारे लेखकाच्या आत्मकथनापासून ते त्यांच्या जीवनात आलेल्या 111 शिक्षकांच्या चरित्राचा ठाव या साहित्यकृतीने घेऊन त्या शिक्षकांपासून मला काय मिळाले ह्याचा लेखाजोखा मांडणारी गुरूंचे गुरुत्व ही समृद्ध साहित्यकृती होय. कारण आजच्या  काळात गुरूंचा महिमा कमी होत असताना, एखादा शिक्षक गुरू-शिष्याच्या नात्याला साहित्याच्या माध्यमातून उजाळा देतो ही साहित्यकृती क्षेत्रातील मोठी घटना आहे. म्हणूनच गुरु शिवाय आपण आपल्या आयुष्याला वळण देऊ शकत नाही ह्या वास्तविकतेची अनुभविक स्वरूपात मांडणी  म्हणजेच गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती होय. प्रस्तुत साहित्यकृतीत एकूण आठ भागात विभागलेली असून एकूण 500 पानाच्या ह्या साहित्यकृतीत लेखकांचं बालपण, शालेय शिक्षण, समाज शिक्षण, डी एड प्रशिक्षण, शिक्षक अनुभव, विस्तार अधिकारी अनुभव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अनुभव, आणि डायट शिक्षण अशी लेखकाची जडणघडण आहे. या जडणघडणीत जवळपास आपल्या जन्मापासूनच्या प्रवासाचे गुरू ते संशोधक मार्गदर्शकपर्यंतच्या टप्प्यांवर भेटलेले वेगवेगळे शिक्षक,समाज शिक्षक  हे लेखकाचं जीवन कसं समृद्ध करून गेले ह्याची मांडणी त्यांनी सविस्तरपणे मांडलेली आहे. सदर साहित्यकृतीस सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ.ह.ना. जगताप सरांची आणि डॉ. पुरुषोत्तम भापकर, माजी शिक्षण आयुक्तयांची प्रस्तावना असल्यामुळे ही साहित्यकृती एक शिक्षकांचा आदर्शत्व  वाढवणारी आहे. म्हणूनच या साहित्यकृतीद्वारे आजच्या होऊ घातलेल्या शिक्षकांना व कार्यरत असलेल्या शिक्षकांना आपण योग्य पध्दतीने कार्य करत गेल्यास आपला  सन्मान आपले विद्यार्थी कसे करतात  त्याची पावती देणारी ही साहित्यकृती असल्यामुळे आज शिक्षकांकडे पाहण्याची समाजाची  जी मानसिकता आहे ती  मानसिकता पुसून टाकण्याची क्षमता या साहित्यकृतीने निर्माण केली आहे.        

   मुळातच गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती वाचताना लेखकांची बालपणातील झालेली जडणघडण वाचताना अक्षरशः वाचकांच्या डोळ्यात पाणी येते. गरीब अशिक्षित कुटुंबात जन्म होऊनही समाजात सदगुणाने व सदाचारी वर्तनाची शिकवणी आई वडिलांच्या विद्यापीठात  मिळाल्यामुळे लेखकावर अध्यात्मिकवादाचा आणि त्यांच्या अध्यात्मिक गुरूचा मोठा पगडा आहे, कारण जीवनातील सर्व समस्या सोडविण्यासाठी जी शक्ती पाहिजे ती त्यांना अध्यात्मिक गुरूकडून मिळते म्हणून अध्यात्मिक गुरूवरील श्रद्धा ही त्यांना आत्मोन्नतीकडे नेते ह्याचा उल्लेख लेखक करतांना दिसतात. लेखकाला शालेय जीवनातच आपल्या शिक्षकांकडून मिळालेल्या इंग्रजीची, हस्तक्षराची, व्यायामाची सवय,स्वंयशिस्त,भाषासंस्कार इत्यादी मुळे आजही लेखक तत्वनिष्ठ व वास्तववादी जीवन जगतोय त्यामुळे  हीच त्यांच्या जीवनाची शिदोरी ठरते. तसेच कावरखे बंधू मुळे आपल्या जीवनाला कसा आकार मिळाला ह्याचाही उल्लेख लेखकाने न चुकता केलेला आहे. तसेच लेखकाच्या वस्तुनिष्ठ वागणुकीमुळे  चुकीच्या कामाच्या संदर्भात झालेली लेखकांच्या बद्दलची तक्रारही राजकारण्यांनी कशी सकारात्मक दृष्टीकोनातून सोडवली याचाही उल्लेख लेखकाने केल्यामुळे राजकारण आणि शिक्षण हे कसं हातात हात घालून चालतं याचं उत्तम उदाहरण लेखकाने सांगण्याचं काम या ठिकाणी केलेले आहे. तसेच राजकारणी व्यक्तीकडून झालेला त्यांचा पहिला सत्कार ही त्यांच्या जीवनासाठी कलाटणी ठरली. तसेच राजकारण्यासोबत राहूनही राजकारण्यांचे गुण स्वतःला लागू न  देण्याचं कौशल्य लेखकाने जोपासलेले आहे. तसेच लेखकांनी ज्या ज्या ठिकाणी काम केल्या त्या संस्था व  त्या ठिकाणचे अनुभव हे त्यांचे गुरूच्या रूपात आहेत. 

   म्हणूनच कोणत्याही परिस्थितीचे भांडवल न करता आल्या परिस्थितीला सामोरे जाऊन चातक पक्षी ज्याप्रमाणात पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणात लेखकांने ज्ञानाची व अनुभवाची सांगड घालून आपली ज्ञानलालसा अद्यापही कमी झालेली नाही हे नव्या पिढीच्या शिक्षकांपुढे आदर्श म्हणून ठेवण्याचे काम लेखकाने केले आहे ही वस्तुस्थिती आहे. गुरूंच्या नियोजनातून सुरु केलेला शिक्षकी पेशा हा वर्ग एक पदापर्यंत  घेऊन जाऊ शकतो आणि त्याचं सर्व श्रेय हे आपल्या गुरूला आहे हे सांगण्याचं धाडस लेखकाच्या मोठेपणाचा हा श्वास आहे. वास्तविक पाहता लेखकांने शेतीपासून ते दवाखाना, हॉटेल पर्यंतची सर्व कामे करून ही त्याचा कधीही गाजावाजा केला नाही किंवा त्याचं भांडवल केलं नाही हीच खऱ्या अर्थानं आपल्या गुरूला दिलेली गुरुदक्षिणा होय. म्हणूनच आपली नोकरी करता करता मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग लेखकाने ज्ञानप्राप्तीसाठी व पदव्या मिळवण्यासाठी उचलला हे ही खरे आहे म्हणूनच लेखक आजच्या शिक्षकांसाठी एक आदर्शरुपी हिरा ठरतो. कारण आजचे शिक्षक नोकरीला लागल्यानंतर नोकरी एके नोकरी करताना आपलं शिक्षण बंद करतात, खरं तर शिक्षक हा कायमस्वरूपी विद्यार्थी असतो हे तत्व काही शिक्षक विसरतात पण हे तत्व लेखकांनी विसरलेले नाही. म्हणजे शिक्षणाने समृद्ध होणाऱ्या ध्येयवेड्या शिक्षकांची ही एक आदर्शवत कहाणी म्हणजेच गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती होय. शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी अविरत प्रक्रिया आहे ही शिक्षणाची व्याख्या लेखकाने तंतोतंत पाळलेली आहे. त्यामुळे साधा डीएडचा एक शिक्षक हा जिल्हा प्रशिक्षण संस्थेचा वरिष्ठ अधिव्याख्याता होऊ शकतो तो इच्छाशक्तीच्या  आणि श्रद्धेच्या जोरावर,त्यासाठी आवश्यक असते ती स्वयंशिस्त आणि वस्तुनिष्ठ  कामाची स्वतःला सवय, व वस्तुनिष्ठ कामाची दुसऱ्याकडून अपेक्षा व स्पष्टवक्तेपणा तसेच इतरांच्या चुकीच्या कामाला चूक आणि चांगल्याच कौतुक करण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येक शिक्षकांमध्ये विकसित होणे अपेक्षित आहे तो दृष्टिकोन विकसित करण्यासाठी  गुरु किती उपयोगी पडतात याची मांडणी गुरूंचे गुरुत्व या साहित्यकृती मध्ये आहे. म्हणूनच जोपर्यंत तुम्ही आपल्या कर्तव्यात कठोरपणा ठेवत नाहीत तोपर्यंत आपण यशाला गवसणी घालत नाही हा वास्तुपाठ ही साहित्यकृती प्रत्येकाला घालून देते. म्हणूनच तुम्ही कोणत्याही जीवनात वावरताना न्याय तत्त्वाचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं आणि तोच न्याय हा सर्वांना सारख्या स्वरूपात देण्याची किमया जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून यशस्वी होऊ शकत नाही हीच शिदोरी लेखकाने आपल्या गुरुंकडून घेतलेली आहे.  तसेच कोणतेही काम करताना आपला मुद्दा वरिष्ठांना कसा पटवून द्यायचा आणि आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांकडून काम करून घेण्याचं कौशल्य आत्मसात कसे करायचे हे सुद्धा गुरुच शिकवतात. तसेच आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणच्या आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाचे तोंड भरून  केलेले कौतुक  हे आपल्या कामावरची निष्ठा वाढवतात त्यामुळे आपल्या कामात कोणतेही अडचणी व समस्या निर्माण होत नाही ही वस्तुस्थिती लेखकाने आपल्या गुरूंकडून स्वीकारलेली आहे. 

   सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या पदावर जाताना आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या व आपल्या माणसांच्या ओळखी कायम ठेवण्याचे कौशल्य सुद्धा  लेखक गुरुकडून शिकतात.तसेच प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आणि प्रत्येक घटनेचा सकारात्मक विचार करण्याची शैली लेखकातत रूजली आणि त्याच सकारात्मक गोष्टीच्या आधारावर मिळालेल्या पदाला न्याय देण्याची भूमिका ही लेखकाकडे असल्यामुळे आजही लेखकाचे पाय जमिनीवरच असल्याचे दिसून येतात. त्यामुळे इतरांच्या  मताचा आदर करणं आणि आनंदाने जगू या आणि आनंदाने सेवा देऊया या सूत्राचा स्वीकार लेखकाने केलेला आहे. त्यामुळे लेखकाच्या जीवनात आलेल्या प्रत्येक गुरूंच्या गुरुत्वाची समीक्षा करताना लेखकाने प्रत्येक गुरूंकडून कोणता न कोणता गुण स्वीकारला आहे हे वास्तव आहे आणि त्याच गुणाच्या जोरावर आज लेखकाची जी  काही यशस्वी वाटचाल सुरू आहे हाच त्याचा खरा मूलमंत्र आहे. म्हणूनच गुरूंचे गुरुत्व हे प्रत्येकाच्या जीवनाला पूर्णत्व  देत असते यात शंका नाही. म्हणुनच गुरुविना जीवनाला आधार नाही ही गुरुची परंपरा लेखकांने जोपासलेली आहे आणि तीच परंपरा येणाऱ्या काळात प्रत्येकांनी जोपासावी हा या साहित्यकृतीच्या मागचा उद्देश आहे.तसेच या साहित्यकृतीची भाषाशैली ही वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवते. गुरुचे गुरुत्व या साहित्यकृतीने साहित्य क्षेत्रात एक नवा आदर्श उभा केलेला दिसतो आणि त्यामुळेच गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती ही इतर साहित्यापेक्षा वेगळी आहे. तसेच लेखकांनी  मुखपृष्ठावर मोबाईलचे चित्र दाखवून आधुनिक तंत्रज्ञानात मोबाइलही हा कसा गुरु ठरतो हे दाखवण्याचे काम लेखकाने केलेले आहे. म्हणूनच आपल्या जीवनात आलेला प्रत्येक  गुरु हेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा ठरतात ही वस्तुस्थिती लेखकाने आपल्या समोर साहित्यकृतीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.म्हणूनच गुरूंचे गुरुत्व या साहित्यकृतीचे वाचक निश्चितच स्वागत करतील अशी अपेक्षा  आहे.


साहित्यकृतीः गुरूंचे गुरुत्व 

लेखकः डॉ. गंगाधर वाळले गोरेगावकर

प्रकाशकः शांभवी प्रिंटर्स अँड पब्लिशर्स, औरंगाबाद

पृष्ठः 500

किमंतः ४५१ रू

Saturday, February 13, 2021

सार्वभौमत्वाच्या नावाखाली रंगले ट्विटर वाँर......

       सार्वभौमत्वाच्या नावाखाली रंगले ट्विटर वाँर…..


आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात समाज माध्यमांचा वाढलेला बोलबाला पाहता आज  प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा समाज माध्यमे ठरू लागली आहेत. त्यामुळे समाज माध्यमातून व्यक्त होणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आणि बहुढंगी असल्याचे दिसून येते. कारण समाज माध्यमांमध्ये तुम्ही काय लिहिता, त्याचा परिणाम समाजावर काय होणार आहे आणि समाज माध्यमांचा उपयोग कसा करून घेता यावरच समाज माध्यमांचे व  वापरणाऱ्यांच्ये भवितव्य ठरते. त्यामुळे ज्या पद्धतीने समाज माध्यमावर तुम्ही व्यक्त होता त्याच पद्धतीनं समाज माध्यम  तुम्हाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवते आणि त्याच पद्धतीने लोकप्रियतेच्या धुंदीत एखाद्या चुकीच्या गोष्टींच्या संदर्भात समाजमाध्यमावर तुम्ही व्यक्त झाल्यानंतर तुमचं अस्तित्व शून्य करायलाही मागेपुढे पाहत नाही त्यामुळे समाज माध्यमांचा वापर कसा करावा हा  ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून समाज माध्यमांवर व्यक्त होतांना प्रत्येकाला स्वतःला सांभाळून घ्यावं लागतं. पण आज समाज माध्यमांवर लोकप्रियतेच्या नावाखाली व्यक्त होतांना लोक स्वतःला सांभाळून घेत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आज प्रत्येकालाच समाज माध्यमांची भुरळ पडली आहे. त्यामुळे आपण त्यात किती वाहून जायचं आहे हा त्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यामुळे समाज माध्यमांचे जेवढे फायदे आहेत तेवढेच दुष्परिणामही आहेत. म्हणून समाज माध्यमातून व्यक्त होताना प्रत्येकाने शक्य तो सत्यता असत्यता जाणून घेऊनच व्यक्त व्हावं  ही समाज माध्यमाची अलिखित आचारसंहिता आहे. 

    म्हणूनच ज्या समाजाचे आपण  नेतृत्व करतो त्या समाजाच्या सर्व स्तरापर्यंत समाज माध्यम तुम्हाला घेऊन जाते म्हणून नेतृत्वाने समाज माध्यमांचा वापर करतांना दक्ष राहणे गरजेचे ठरते अन्यथा समाज माध्यमांवर तुम्ही  केलेली नकळत व जाणीवपूर्वक चूक ही तुमची लोकप्रियता मातीत घालू शकते. म्हणूनच आज समाज माध्यमांमध्ये भावनेच्या पुरात वाहून जाता येत नाही, जर तुम्ही भावनेच्या पुरात वाहून गेला तर समाज माध्यमे आणि समाज नक्कीच तुमचा सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर करू शकतात त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे समाज माध्यम हे एक शास्त्र आहे त्या शास्त्राचा उपयोग प्रत्येकाने अभ्यास करुन केला पाहिजे.

   ज्या समाज माध्यमाच्या संदर्भात आपण विचार करतो आहोत त्यावेळेस आज समाज माध्यमांमध्ये ज्याला आपण आदर्श मानतो त्यात महान व्यक्ती नेहमीच समाजा माध्यमात व व्यक्त होतात आणि त्या समाज माध्यमावर व्यक्त झाल्यानंतर त्यांच्याकडून काहीतरी आदर्श, विचार,प्रेरणा आपल्याला मिळेल या उद्देशाने त्यांचे समाज माध्यमांवर त्यांना फॉलो करणारांची  संख्या लाखोंच्या घरात असते. फॉलो करणारे हे तुमच्या विचाराचे असतीलच याची शाश्वती देता येत नाही त्यामुळे लाखो फॉलोअर्स समोर व्यक्त होतांना समाज भान ठेवणं गरजेचं असतं पण ते समाज भाण भारतीय सेलिब्रेटिंकडून, भारतीय क्रिकेटपटूकडून मधल्या काळात होऊ शकलं नाही ही एक वस्तुस्थिती आहे. त्याला कारण ठरलं ते गेले दोन महिन्यापासून चालू असलेले शेतकरी आंदोलन. शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाँप सिंगर रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर भारतीय सेलिब्रिटीज हे झोपेतून खडबडून जागे झाले. एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कलाकार हा भारतीय शेतकऱ्यांच्या संदर्भात समर्थनाचे ट्विट करतो आणि त्या ट्विटच्या आधारावर भारतीय सार्वभौमत्व कसे धोक्यात आलं आहे किंवा धोक्यात येत आहे ही अपेक्षा ज्या पद्धतीने भारतीय सेलिब्रिटींनी व्यक्त केली तीच अपेक्षा गेली दोन अडीच महिने या सेलिब्रिटीजकडून शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात  एकही  ट्विट किंवा भूमिका मांडली नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. वास्तविक पाहता आपणही आंतरराष्ट्रीय  पातळीवर एखाद्या प्रश्नांवर आपण ज्यावेळी त्या घटनेचे समर्थन करतो त्यावेळी या देशाचे सार्वभौमत्व धोक्यात येत नाही का? हा बाळबोध प्रश्न या सेलिब्रिटिजना पडलेला दिसत नाही. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या सार्वभौमत्वाचा आदर   करणे हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा गाभा असला तरीही  मानवतावादाचा आधार घेत आपणही अनेक आंतरराष्ट्रीय प्रश्नांनाचे समर्थन करतोचना, त्यामुळे इतर राष्ट्रांचे सार्वभौमत्व धोक्यात येत नाही. त्यामुळे सार्वभौमत्वाचा नावाखाली प्रपोगंडा करण्याची एक चढाओढच आज समाज माध्यमाच्या माध्यमातून सेलिब्रिटीने केल्याचे दिसून येते. वास्तविकता सार्वभौमत्वाच्या संदर्भात कोणतेही राष्ट्र तडजोड करत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात सरकार समोर जी संकट उभी राहिली त्या संकटाची पार्श्वभूमी पाहता ज्या सेलिब्रिटीजनी सार्वभौमत्वाचा आधार घेत जे काही ट्विट केले त्याची पार्श्वभूमी पाहिली तर  एका आंतरराष्ट्रीय पॉपस्टाअर्सने ट्विट केल्यानंतर यांची सार्वभौमत्वाची आणि अखंडत्वाची अस्मिता आपोआप कशी काय जागी होते हाच खरा प्रश्न आहे. गेले 75 दिवस या सेलिब्रिटिजना आणि भारतरत्नांना भारतीय सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आलेली आहे हे समजलं नाही का? याचे उत्तर हे भारतरत्न आणि सेलिब्रिटीज देतील काय?या दोन्ही प्रश्नांचं उत्तर त्यांच्याकडे असलेल्या स्वतःच्या विवेकाचा वापर न केल्यामुळे  ते देणार नाहीत. वास्तविक पाहता भारतरत्न पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्ती आणि सेलिब्रिटी हे जर स्वतःच्या विवेकाचा वापरच करत नसतील तर मग त्यांच्या भारतरत्नाला आणि सेलिब्रिटीतत्वाला कोणता अर्थ उरतो हे काही कोणत्या ज्योतिषाला विचारण्याची गरज नाही.कारण या सेलिब्रिटिजना कोणीतरी ट्विट करायला लावले आहेत. तसेच सेलिब्रिटीजनी जे  ट्विट केले आहे त्याची  प्रिंटेड कॉपी  ही त्यांना पुरवण्यात आल्याचे  दिसून येते कारण या ट्विटमध्ये काही शब्दनशब्द हे  मोठ्या प्रमाणात सारखे आहेत, तर काही सेलिब्रिटीनी ट्विट भाजपच्या नेत्यांना टँग् केलेले आहे  त्यामुळे ह्या ट्विटवर शंका घेण्यास मोठा वाव निर्माण होतो. 

   म्हणूनच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटीजच्या ट्विटच्या चौकशी करण्याची मागणी केली. वस्तुस्थिती पाहता अनेक सेलिब्रिटजनी  जे ट्विट केलं त्या सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी   देण्याचे  स्पष्ट केल्याने.  लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगन, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी होणार आहे.वास्तविक पाहता विरोधी पक्षाला जी गोष्ट अपेक्षित होती तीच गोष्ट राज्याच्या गृहमंत्र्याच्या आदेशामुळे झाल्यामुळे या प्रकरणाचा मुद्दा विरोधी पक्षाने उठवला त्यात नवल वाटण्यासारखे काही  ही नाही, म्हणजे राज्य सरकार आणि विरोधी पक्ष हे ट्विटच्या प्रश्नांवर  खेळ  खेळ खेळणार व सर्वसामान्यांचे प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यातच विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांनी धन्यता मानलेली दिसते. 

    ट्विटच्या राजकारणाची वस्तुस्थिती लक्षात घेता जनतेची दिशाभूल करणाऱ्या कोणाचीही सरकार चौकशी करू शकते. त्यामुळेच सरकारने चौकशीचे आदेश दिले असल्याने सेलिब्रिटीच्या अस्तित्वाला काही अंशी तरी धक्का बसला ही वस्तुस्थिती आहे. तसेच ट्विटच्या या राजकारणापायी भारतरत्नाचीही चौकशी केली जाणार ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे राज्यात एक मोठे वादळ निर्माण झालेले आहे. वास्तविक पाहता भारतरत्न सारख्या व्यक्तीने सुद्धा कोणत्याही प्रश्नावर भाष्य करताना त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करणं गरजेचं ठरतं पण या भारतरत्नांनी त्याचा दूरगामी विचारांचा विचार कुठेही केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक पाहता सेलिब्रिटीच्या व भारतरत्नांच्या फॉलॉवरसनी त्यांचा समाचार घेतल्यामुळे त्यांना ही त्यांची काहीतरी चूक झाली हे त्यांच्या लक्षात आले असेलच पण त्या चुकीची माफी मागण्याचा मोठेपणा हे लोक दाखवतील का हाच खरा प्रश्न आहे. वास्तविक पाहता कोण कुठली रिहांना पण तिच्या एकाच ट्विटमुळे भारतातील भारतरत्न आणि सेलिब्रिटीचे खरं रूप हे जगासमोर आण्यात ती यशस्वी झाली यात मात्र शंका नाही. वास्तविक पाहता सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर हे राज्यसभेचे खासदार होते त्यांनी आपल्या खासदार निधीतून अनेक एनजीओच्या मार्फत कामे केली ही वस्तुस्थिती आहे पण भारताच्या सार्वभौमत्वाच्या संदर्भात राज्यसभेत कधी प्रश्न विचारल्याचं ऐकवत नाही, त्यामुळे रिहाणाच्या एका ट्विटमुळे खरंच भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे का? हा प्रश्न सरकार ने सांगण्याच्याऐवजी सेलिब्रिटी आणि भारतरत्न का सांगतायात हाच खरा प्रश्न आहे. म्हणजेच  केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावरून कुठे ना कुठेतरी कमी पडते ही वस्तुस्थिती काही लपून राहत नाही. म्हणूनच देशाच्या पंतप्रधानांना आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी ही जमात उदयास आली आहे असं म्हणावं लागतं. म्हणजेच या सरकारला  लोकांच्या हक्क अधिकाराच्या बाबतीत कोणत्याही संवेदना नाहीत. आपल्या हक्क आणि अधिकाराच्या बाबतीत जागृत असलेले आंदोलनाच्या माध्यमातून आपले हक्क आणि कर्तव्य पदरात पाडून घेणाऱ्यांनाच आंदोलनजिवी म्हणणारे जर या देशात असतील तर खरंच या देशाची वाटचाल ही लोकशाही स्वरूपाची राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटीजनी जे काही ट्विटचा उद्योग  चालवला त्या उद्योगाचा बोलवता धनी हा कोणीतरी दुसरा असला पाहिजे ही वस्तुस्थिती काही लपून राहत नाही त्यामुळे केद्र सरकार भारतरत्नांना, सेलिब्रिटींना पुढे करून चर्चेपासून पळ काढुन भारतीय सार्वभौमत्वाच्या नावाखाली ट्विटर वाँर करण्यात यशस्वी झालेलं आहे. म्हणूनच  आज केंद्र सरकारचे नवे प्रवक्ते म्हणजेच भाट म्हणून आता सेलिब्रिटीकडे आपल्याला पाहावे लागत आहे. 


 ( लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)


मोदीची गॅरंटी ; तरीही भाजपा समोर आव्हानच……

  मोदीची गॅरंटी ; तरीही  भाजपा समोर  आव्हानच…… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात लोकसभेची सेमीफायनल भाजपने जिंकली असली तरीही, ...