शिवसेना उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी कोणाची?
महाराष्ट्रात राजकीय महानाट्याचा प्रयोग सध्या जोरात चालू आहे. या महानाट्याचा प्रयोग यशस्वी व्हावा आणि हाउसफुलचा बोर्ड लागावा यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात बाजी सध्या सुरू असतानाच आपले ओझे कुणाच्या खांद्यावर आहे हे सांगण्याची योग्य वेळ शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी साधल्याचे दिसून येते. शिवसेनेच्या प्रवक्तांनी जे विधान केलेले आहे त्यामध्ये त्यांचे असे म्हणणे आहे की आम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपची आहे, भाजपच्याही एका वरिष्ठ नेत्यांने जशी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडूण आणायची जबाबदारी ही भाजपची आहे, तसेच भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी ही शिवसेनेची आहे याची री ओढली आहे. एकंदरीतच हे परस्पर पूरक विधाने पाहता युती आणि आघाड्या ह्या एकमेकांच्या सहकार्याने निवडून येण्यासाठीच केल्या जातात ही वस्तुस्थिती जरी असली तरी युती आणि आघाड्याचे स्वरूप पाहता वेगवेगळे राजकीय पक्ष एकमेकांच्ये प्रामाणिकपणे काम करतीलच याची शाश्वती देता येत नाही.त्यामुळे निवडणुका झाल्या आणि निवडणुकांचे निकाल लागले की युती आणि आघाडीतले पक्ष एकमेकांवर आरोप करतात की युती आघाडीचा धर्म पाळला गेला नाही ही वस्तुस्थिती पाहता या आरोपांमध्ये मोठ्या प्रमाणात तथ्य आहे.
काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पूर्वी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे काम करत तेच काम आता युतीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये होताना दिसून येते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या विरोधात अनेक बंडखोर उमेदवार उभे केले होते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेचे अनेक उमेदवार हे पराभूत झाले होते. शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी जे आज विधान केलेला आहे त्याच विधानाचा दाखला देताना त्याच प्रवक्त्याच्या मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत भाजपाचा बंडखोर उमेदवार हा दुसऱ्या क्रमांकाची मते घेतो, हे त्या प्रवक्त्याला माहीत आहे. त्यामुळे 2019 ची वस्तुस्थिती सध्याच्या परिस्थितीत लागू होणार नाही. ह्याचा विचार करून 2019 मध्ये अखंड असलेली शिवसेना आज दोन गटात विभागल्या गेली आहे. मुळात मूळ शिवसेना ही शिंदे गटाकडे गेली असली तरीही शिंदे गटातील उमेदवारांना निवडून येण्यासाठी आज भाजपची मोठ्या प्रमाणात गरज लागणार आहे. पण ती गरज भाजपा हे प्रामाणिकपणे पार पाडेल का? हा मूळ विषय आहे.कारण भाजपचा मूळ अजेंडा असा आहे की हिंदुत्ववादी विचाराचे दोन पक्ष त्यांना नकोय म्हणून त्यांनी मुळात राजकीय द्वेषापोटी शिवसेना संपवली असली तरी सुद्धा शिवसेना संपत नाही, उलट शिवसेना संपवण्याची नकारात्मक बाब ही भाजपवरच उलटते आहे, ही वस्तुस्थिती भाजपाने लक्षात घेतलेली आहे आणि त्याच आधारावर आज शिंदे शिवसेनेच्या नेत्यांना मूळ शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येण्याची व निवडणूक लढविण्याची भीती वाटत आहे त्यामुळे आज बहुसंख्य शिंदे शिवसेनेचे उमेदवार हे भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक आहेत.
मुळात जर शिंदे शिवसेनेचे उमेदवार हे भाजपाकडून लढण्याच्या तयारीत असतील तर शिंदे शिवसेनेसोबत जे बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा जे केडर गेलेले आहे ते केडर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाकडे नक्कीच वळेल, म्हणजेच बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा जो गट आहे त्या गटाची भ्रम निराशा होईल. वास्तविक पाहता शिवसेना पक्षाची जी ताकद होती ती ताकद तर आपण पाहिली तर मुळात केडर हे उद्धव ठाकरे गटाकडे राहिलेले आहे आणि नेते हे शिवसेनेत राहिलेले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे अपात्रतेची टांगती तलवार ही शिवसेनेच्या आमदारावर आहे. तसेच शिवसेना कुणाची यासंदर्भातला वाद सर्वोच्च न्यायालयात चालू आहे आणि तो निकालही जर शिंदे शिवसेनेच्या विरोधात गेला तर शिंदे शिवसेनेची अवस्था ही काय असेल हे सांगण्याची कोणत्याही ज्योतिषाला गरज भासणार नाही.त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे आज त्यांना वेगवेगळी विधान करून चर्चेत राहावे लागते. त्यामुळे शिंदे शिवसेनेचा राजकीय अंत या निवडणुकीत होईल की काय अशी भीती आणि संभ्रमाची अवस्था शिंदे शिवसेनेच्या गटात निर्माण झालेली आहे. त्याचाच फायदा हा भाजपकडून आज उठवल्या जातोय.
वास्तविक पाहता शिवसेना नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न पाहता गेली 20-25 वर्षे निवडून येणारे शिवसेनेचे नेते हे जर आज आत्मविश्वास गमावून जर निवडणूक लढवणार असतील तर गेल्या 25 वर्षात त्यांनी पक्ष बांधणीसाठी आणि पक्षासाठी काय केले याचा फोलपणा आता उघडा होताना दिसतोय. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की यांचे राजकीय अस्तित्व हे पक्षामुळे होते हे एकदा पुन्हा सिद्ध होते, त्यामुळे आजच्या राजकीय परिस्थितीत भाजपा जसे म्हणेल तसेच शिवसेना शिंदे गटाला वागल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध सध्याच्या स्थितीत नाही ही वस्तुस्थिती आहे, पण ती वस्तुस्थिती शिंदे शिवसेना नाकारताना आपल्याला दिसते. त्यातूनच शिंदे शिवसेनेत आणि भाजपमध्ये सर्वकाही अलबेल आहे असेही नाही त्याची नेमकी परिस्थिती शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहेच. त्यामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. तशीच संभ्रमावस्था भाजपा नेतृत्वाची ही झालेली आहे. शिंदे शिवसेना ही भाजपासाठी ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ अशी झाल्यामुळे शिवसेनेचे ओझे हे भाजपवर येऊन पडलेले आहे. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला शिंदे शिवसेनेला सोबत घेऊन जो लाभ मिळवायचा होता तो लाभ मिळण्याच्या ऐवजी तोटाच मोठ्या प्रमाणात सध्या तरी होताना दिसतोय.त्यातूनच आम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी ही भाजपची आहे असे विधान करून नेमक्या जनमानसात काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहण्यासाठीच तर शिवसेनेने हे विधान करून एक खेळी निर्माण केल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे राजकारण करताना राजकारणात पूर्णविराम हा कधीही देता येत नाही तर त्यासाठी राजकारणात कॉमा मारून एकमेकास जोडावे लागते ही परिस्थिती आजच्या परिस्थितीत शिंदे शिवसेनेने आणि भाजपाने ओळखलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपा आणि शिंदे शिवसेनेचे अस्तित्व काय आहे हे आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून दिसेलच यात शंका नाही.









