आवाज कुणाचा विरोधी पक्षनेत्यांचा….
राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून नेहमीच सत्तेच्या शोधात राहिलेल्या भाजपला यशाने हुलकावणी दिली. भाजपकडून सरकार पाडण्याची कालमर्यादा जाहीर करण्यात आली पण त्या कालमर्यादेत सरकार काय पडत नाही आमदार का फुटत नाहीत, हे लक्षात आल्यावर भाजपाकडून असं सांगण्यात आलं की सरकार पाडण्यात आम्हाला कोणताही रस नाही आणि हे सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल. म्हणून विरोधी पक्षांकडून सरकारच्या कर्माचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आणि तो विरोधी पक्षाने करणे सुद्धा अभिप्रेत आहे.त्यात त्यांना सध्या तरी मोठ्या प्रमाणात यश मिळताना दिसत आहे.त्यामुळेच सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष हा मजबूत आणि बळकट असावा लागतो त्याचं उदाहरण हे महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील सध्याचे विरोधी पक्षनेते हे देवेंद्र फडणवीस एक धुरंदर राजकारणी आहेत यात शंकाच नाही.सध्याच्या समकालीन राजकीय परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सारखा हुशार आणि चतुर व्यक्तिमत्त्वाचे नेतृत्व सध्या तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणून सध्या सरकारवर होणाऱ्या आरोपाचे खंडन करण्यासाठी देवेंद्र फडणवीसाच्या तोडीचा माणूस सत्ताधाऱ्यांकडे नाही ही सत्ताधाऱ्यांची बाजू सध्यातरी कमकुवत आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधार्यांकडे प्रशासनाची जाण व प्रशासनावर वचक निर्माण करणारे अनेक नेते असतानासुद्धा सत्ताधार्यांना प्रशासनावर आपली मजबूत पकड अद्यापही निर्माण करता आली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचाच पुरेपूर फायदा सध्या विरोधी पक्षांनी उचलला आहे आणि तो उचललाच पाहिजे यात कोणतेही दुमत नाही.
आज सत्ताधार्यांना ज्या गोष्टी अगोदर माहीत होत नाहीत त्या गोष्टी विरोधी पक्षनेत्यांकडे अगोदरच उपलब्ध असतात म्हणजेच विरोधी पक्ष नेते हे सत्ताधार्यांपेक्षाही किती जागृत आहेत हे आपल्या लक्षात येतं. विरोधी पक्ष नेत्यांकडे उपलब्ध होत असलेली अगोदरच माहिती आणि त्याचे स्त्रोत्र पाहता ही माहिती नेमकी त्यांच्याकडे कोणत्या माध्यमातून जाते याचा शोध घेणे हे सत्ताधाऱ्यांचे काम असताना सुद्धा सत्ताधारी झोपेचं सोंग घेतात म्हणजे सत्ताधाऱ्यांचे चाललंय काय? हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. वास्तविक पाहता विरोधी पक्षनेत्यांकडे उपलब्ध असलेली माहितीचा खजिना आणि त्या माहितीचा खजिनाच्या आधारावर तयारी करून सभागृहात येणे अभिप्रेत आहे ते काम विरोधी पक्ष नेते मात्र सध्यातरी चोख करताना दिसत आहेत. खरंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्ष नेत्यांच्या क्षमता आणि ताकद माहित असूनही सत्ताधारी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेतृत्वाला हलक्याने का घेतात हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वास्तविक पाहता विरोधी पक्षानेत्यांच्या क्षमता बघता सत्ताधाऱ्यांनी तयारी करून सभागृहात येणं अभिप्रेत असताना सभागृहात मात्र सत्ताधारी नेहमीच फरफटत जातात. म्हणूनच त्यामुळे विरोधी पक्ष नेतृत्वाची सभागृहातील भाषणे ही अभ्यासपूर्ण असतात यात शंकाच नाही, पण त्या अनुषंगाने त्यांची जी मुद्दे मांडण्याची जी काही सध्याची प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती मात्र योग्य नाही हे ही तेवढेच खरे. पण राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी तेवढा आवेश हा विरोधी पक्ष नेत्यांकडे असने ही गरजेचं असते. म्हणूनच सध्याचे विरोधी पक्ष नेते हे ज्या आवेशात सरकारवर तुटून पडत आहेत तोच आवेश जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी तो कधी दाखवलेला ही दिसत नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही. म्हणूनच आलेल्या संधीचा कसा फायदा घ्यायचा हे विरोधी पक्ष नेत्यांना चांगलेच अवगत असल्याने त्यांना सरकार पाडण्यासाठी कोणतेही फासे टाकायचं काम पडत नाही तर त्यांच्या फाशात सरकार आपोआप गळाला लागलं ही एक महत्त्वाची घटना या ठिकाणी नमूद करणं अभिप्रेत आहे.
मुळातच सध्याच्या काळात सरकारची नौका ही डळमळीत होऊ लागली आहे आणि याला सत्ताधारी स्वतः जबाबदार आहेत.सुशांत सिंह,अर्नब गोस्वामी,या प्रकरणामुळे सरकार चर्चेत होतच. पण ह्या सरकार मधील मंत्री धनंजय मुंडे, संजय राठोड यांच्या प्रकरणामुळे सरकार अधिक चर्चेत आले. वरील सर्व प्रकरणात सरकारची भूमिका ही संशयास्पद राहिली त्यातून सरकारच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आणि त्याचा पुरेपूर फायदा विरोधी पक्ष नेत्यांनी उचलून संजय राठोडाची विकेट काढली.त्यानंतर मुकेश अंबानीच्या घरासमोर सापडलेली स्फोटके, मनसुख हिरेन आत्महत्या आणि हत्या प्रकरण आणि त्यात असलेला प्रत्यक्ष पोलिसांचा सहभाग ह्यामुळे तर सरकारची होती नव्हती इज्जत ही मातीत गेली.या प्रकरणात विरोधी पक्ष नेत्यांनी जी मुद्देसूद पुराव्याची मांडणी केलेली असतानाही सरकारने कारवाई करण्यास हलगर्जीपणा केला आणि त्यातूनच त्या हलगर्जीपणातून थातूरमातूर कारवाई करून वेळ मारून नेण्याचा काम सरकारने केले. उलट्या प्रकरणातील संशयितांना ते काय ओसामा बिन लादेन आहेत काय अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्याच वेळी मुख्यमंत्र्याच्या प्रतिष्ठेला ही धक्का लागला. त्याच वेळी हा तपास एटीएस,एनआयकडे गेल्यावर त्या माध्यमातून समोर आलेले चित्र हे अत्यंत भयानक स्वरूपाचं होतं त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी सरकार वर वसुली सरकार म्हणून आरोप केले, आणि त्यातून भाजपकडून आता दोन मंत्री घरी जाणार हा संदेश दिला आणि त्याच संदेशाला व आरोपाला पुष्टी देण्याचे काम काल माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटर बाँम्बने केल्यामुळे सरकारची संपूर्ण ईज्जत ही मातीत गेली. परमविर सिंग यांच्या पत्राचा उल्लेख पाहता त्यांनी गृहमंत्र्यांवर जे काही आरोप केले त्या आरोपातील महत्त्वाचा आरोप म्हणजे गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी वसुलीचे आदेश दिले असं स्पष्ट मुख्यमंत्री आणि राज्यपालाना कळवलं, त्यासाठी त्यांनी आपल्या अधिकारी वर्गाशी झालेलं संभाषण जोडलेले आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर वळणावर आलेले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाचा विचार करता सरकार बदलल्यानंतर मंत्र्यांचे सचिव,पीए बदलतात. पण ह्या सरकारच्या बाबतीत मात्र याठिकाणी वेगळेच घडताना दिसत आहे कारण प्रशासनात मोठ्या प्रमाणात बदल केल्यानंतरही प्रशासनावर सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांचाच प्रभाव कालही होता आणि आजही आहे हे सिद्ध होते.
सरकारवर आलेल्या सुरुवातीच्या संकटातूनही महाविकास आघाडीचे नेते शहाणे झाले नाहीत हेच सरकारचे दुर्भाग्य समजावं लागेल, आणि म्हणूनच माहितीच्या जोरावर आणि प्रशासनातील प्रभावाच्या जोरावर आज विरोधी पक्ष नेत्यांनी संपूर्ण सरकारची खुर्ची हलवलेली आहे यात मात्र कोणतीही शंका नाही. म्हणूनच देवेंद्र फडणवीस संजय राठोडच्या प्रकरणात म्हणाले होते की, संजय राठोड हे सरकारचे काहीही करू शकत नाहीत पण सचिन वाझे हे सरकार हलवू शकतात हे त्यांचे विधान आज तंतोतंत खरे ठरले आहे. म्हणूनच परमवीर सिंगच्या एका पत्राने सरकार खडबडून जागं झालं. पण या पत्राचा विचार करता सरकारची सावरण्याची वेळ आता मोठ्या प्रमाणात निघून गेलेली आहे हे ही वास्तव आहे. म्हणूनच विरोधी पक्षांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्या जाते, सरकार बरखास्तीची मागणी केली जाते आणि याचाच विचार करता गृहमंत्र्यावरील झालेले आरोप पाहता त्या आरोपाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जर आपण पोहोचलो तर असं लक्षात येतं की हे प्रकरण दिसते तेवढे साधे आणि सरळ सोप्या मार्गाचं नाही. त्यामुळे या प्रकरणांमध्ये अनेक मोठे मासे गळाला लागण्याची संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे, आणि ती संधी विरोधी पक्ष कधीही सोडणार नाही. म्हणूनच राज ठाकरेंनी सुद्धा आज जी काही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचा मुद्दा पाहता "या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीनं होणार नाही. केंद्र सरकारनं या प्रकरणाची कसून चौकशी करायला हवी" ही जी काही मागणी केली त्या मागणीचा विचार करता सरकार मोठ्या प्रमाणात अडचणीत आलं ही वस्तुस्थिती आहे. ह्याच प्रकरणावर राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवारांनी सुद्धा या प्रकरणातील काही बाजू परमवीर सिंगावर लोटल्या आणि याची चौकशी झाली पाहिजे हा मुद्दा मांडला.शरद पवार यांच्या विधानामुळे विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला केवळ चौकशी ही परमवीर सिंगाची झाली पाहिजे की संपूर्ण घटनेची झाली पाहिजे असा प्रश्न त्यांनी शरद पवारांना विचारला दिसतो. त्यातूनच या प्रकरणामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेने पुढील अडचणी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. म्हणूनच आज भाजपचे किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचं नाव घेऊन त्यांचीही विकेट जाणार असं विधान केलं त्यामुळे या प्रकरणाच्या सुरुवातीलाच भाजपकडून दोन मंत्र्यांच्या राजीनामे होणार ह्याच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या जात होत्या त्या गोष्टीची वास्तविकता आता उजेडात येत आहे.
एकंदरीतच आज पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाचे लोन हे इतरही विभागात पोहोचू शकते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात ही पत्राची नुसती सुरुवात आहे. म्हणजेच आणखी मुख्य खेळ सुरू व्हायचा बाकी आहे. त्यामुळे ह्या अधिकारी वर्गाला नेमके पाठबळ कोणाचं आहे ह्याचाही विचार सरकारने गांभीर्याने करणे गरजेचे ठरते. कारण ह्या सरकारला जनतेच्या मनातून उतरविण्याचे काम या ठिकाणी सुरु झाल्याचं दिसून येतं आणि त्याच संधीचं सोनं करण्याची जबाबदारी ही विरोधी पक्षनेत्यांनी स्वीकारलेली आहे ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आज सत्ताधाऱ्यांना आपले पाय जमिनीवर ठेवून आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. पण ती आत्मपरीक्षण करायची वेळ आपल्यावर का आली ह्याचा विचार स्वतः करतील का नाही हे सांगता येत नाही कारण सत्ताधारी हे हवेत आहेत. आणि त्या हवेतील फुग्याची हवा काढण्याचे काम विरोधी पक्ष नेत्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे केलेले आहे.म्हणूनच खऱ्या अर्थानं आज राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर पकड निर्माण करणं गरजेचं आहे. तरच या तीन पक्षाच्या आघाडीची ऑटोरिक्षा ही व्यवस्थित मार्गाला धावेल अन्यथा बुलेट ट्रेन खाली यायला त्यांना वेळ लागणार नाही.यासाठी आवश्यकता आहे ती परमवीर सिंग यांच्या आरोपाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर योग्य ती कार्यवाही झालीच पाहिजे तेव्हाच सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर जाईल. अन्यथा या आरोपाच्या संदर्भात सर्वसामान्याच्या मनात जी काही साशंकता निर्माण झालेली आहे ती म्हणजे खरेच आपले लोकप्रतिनिधी हे असे धंदे करतात का? याला उत्तर येणारा काळच देईल.म्हणून येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधीचा धंदा करा चंदा गोळा असं म्हणावे लागले तर नवल वाटू नये. कारण आजच्या परिस्थितीत राज्यात सध्या विरोधी पक्षाच्या व विरोधी पक्षनेत्याच्या बोलबाल्यामुळे महाविकास आघाडीची झोप उडाली आहे यात मात्र शंका नाही.
(लेखातील सर्व फोटो गुगलवरून साभार)









छान आणि वास्तववादी लेख...
ReplyDeleteThanks sir 👏👏👏
Deleteअभ्यासपूर्ण विवेचन
ReplyDeleteधन्यवाद 👏👏👏
Delete