वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना….
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो,अशा वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…. देणाऱ्यांसाठी हे दोन शब्द. वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील आपले मित्र असो वा कौटुंबिक परिवार सदस्यांचा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. कारण वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण प्रत्येकाला सदैव आनंददायी ठेवतात आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी प्रत्येकाच्या हृदयात सतत तेवत राहतात. यासाठीच प्रत्येक जण आपल्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. त्यातूनच आपण दिलेल्या शुभेच्छांचा ती प्रिय व्यक्ती सदिच्छापणे स्वीकार करतेच पण त्या शुभेच्छाचा सदिच्छा स्वीकार करत असताना ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या शुभेच्छाच्या दृष्टिकोनातून आपण किती कृतघ्न आहोत हे दाखवण्याचा प्रकार काल मराठवाड्यातील एका साहित्यिकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घडलेला आहे.
वास्तविक पाहता आज प्रत्येक क्षेत्रात काही नामवंत लोक पुढे येत आहेत आणि पुढे येताना या क्षेत्रात आपलं नाव किती, आपला आवाका किती, आपली कुवत किती, आपली क्षमता किती याची जाण आज कोणालाही राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे तथाकथित लोक पुढे येताना आपल्या दिसतात आणि त्यांनाच आपण त्या क्षेत्रातील एकमेव अद्वितीय आहोत असं वाटायला लागतं. आणि त्यातूनच छोटे-मोठे प्रकार या ठिकाणी घडताना दिसतात मग त्यामध्ये प्रामुख्याने मान सन्मानाचा, अपमानाचा, इतरांना कमी व तुच्छ लेखण्याचा व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही या क्षेत्रातील अद्वितीय असल्यामुळे आमच्याकडून लोकांना काहीतरी हवे आहे हा अहंभाव त्यांच्या मनात ठासून भरलेला असतो. वास्तविक पाहता चूक त्या तथाकथित लोकांची नसते तर ती चूक आपली असते कारण आपणच त्यांना मोठे करतो आणि त्या तथाकथित लोकांना त्या मोठेपणाचा प्रभावाखाली आणि शाली खाली दबल्यामुळे लोकांना वाटेल तसं समजण्याची मानसिकता या तथाकथित लोकांची बनते आणि तोच प्रकार कालच्या त्या साहित्यिकांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाहावयास मिळाला.
प्रामुख्याने एखाद्या नेत्याच्या वाढदिवसाच्या जसा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा होतो तसा त्या साहित्यिकाचा वाढदिवस हा सोशल माध्यमावर धुमधडाक्यात साजरा झाला, त्या साहित्यकाला अनेक नामवंत लोकांनी शुभेच्छा दिल्या, त्या नामवंतांच्या शुभेच्छाचा आदरपुर्वक स्वीकार केला गेला.तसेच साहित्यिकाचे नाव ऐकून अनेक हौसे, गवसे, नवशे यांनीसुद्धा त्या साहित्यिकाला शुभेच्छा दिल्या.शुभेच्छा देताना साहित्यिक आपल्या भागातला आहे, आपला मित्र आहे या अनुषंगाने त्या साहित्यिकाच्या बद्दल दोन चार जास्तीचे शब्द लिहिल्यामुळे, ते दोन चार शब्द त्या साहित्यिकाला अतिशयोक्ती वाटली, खरं तर ती अतिशयोक्ती आहे हे साहित्यिकाला माहित असताना सुद्धा तो साहित्यिक त्या अतिशयोक्तीला उद्याचा दिशादर्शक समजतो त्यामुळे शुभेच्छाच्या महापुरात तो साहित्यिक इतका वाहून गेला की त्याला आपल्या आभार पत्रात काय लिहावं हे सुद्धा सुचलं नाही ही वास्तविकता आहे. म्हणून त्या साहित्यिकाचे आभार पत्रातील काही भाग मी जशाच्या तसा मांडतो आहे त्यात कोणतीही तोडफोड केलेली नाही, कारण साहित्यिकाने आभार पत्रात शुभेच्छा देणाऱ्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनावरून त्या साहित्यिकाची मानसिकता कोणत्या प्रकारची आहे हे आपल्या लक्षात येईल. "वाढदिवस वगैरे ही गोष्ट आपल्या कधी खीजगणतीतही नव्हती. समाज माध्यमांचा जेव्हा बोलबाला झाला तसा वाढदिवस वगैरे साजरा करण्याची टूम आम्हा खेडूत माणसांना कळू लागली. समाज माध्यमातून एकमेकांना संदेश देणे घेणे, फोन, मेसेज प्रत्यक्ष भेटीद्वारे शुभेच्छांचा सिलसिला सुरू झाला. इथपर्यंत सर्व ठीक आहे पण पुढील वाक्य आभार पत्राची दिशाच बदलते परंतु याचा उपयोग ज्या माणसाकडून खूप काही मिळवायचे आहे अशा लोकांच्या बाबतीत अधिक दिसून येतो, हे सत्य असले तरीही मात्र आपल्या सारख्या फाटक्या माणसाला वाढदिवशी स्नेहपूर्ण शुभेच्छांच्या श्रीमंतीची अनुभूती यावी यासारखी जगात दुसरी मौल्यवान गोष्ट किंमत काय असू शकते…..!
वरील वाक्यातून शुभेच्छा देणाऱ्यांना काय सुचवायचे ते त्या आभार पत्रातून व्यक्त होते. शुभेच्छा देणाऱ्यांना या साहित्यिकाला हेच सुचवायचे की माझ्याकडून तुम्हाला काहीतरी हवं आहे आणि त्या लोभा पोटी तुम्ही मला शुभेच्छा देत आहात, आणि दुसऱ्याच वाक्यात आपल्याला स्वतः फाटके समजायचं, तर शुभेच्छा पत्रातील दुसऱ्या परिच्छेदातील एक वाक्य पुन्हा अधोरेखित करण्यासारखा आहे ते पुढीलप्रमाणे " मित्र मंडळींनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून केलेल्या सर्वच भावना ह्या सत्या पर्यंत पोहोचत नसल्या, प्रेमपूर्वक अतिशयोक्ती ज्यात अधिक असली तरी त्या भविष्यासाठी दिशादर्शक आहेत." म्हणजे मित्रमंडळींनी लिहिलेले दोन-चार शब्द त्यात साहित्यिकाला अतिशयोक्ती वाटतात. कारण साहित्याच्या भाषेत लिहिणारे हे मित्र त्याचेच आहेत, खरे तर कोणत्याही साहित्यिक आपलं साहित्य रसपूर्वक आणि सौंदर्यपूर्वक होण्यासाठी दोन-चार शब्दाची अघळपघळ करतातच म्हणजेच दुधात जास्त पाणी टाकतात. त्यालाच हा साहित्यिक अतिशयोक्ती म्हणत असेल तर आज या साहित्यिकाचे पाय जमिनीवर नाहीत असं समजायला हरकत नाहीत. खरे तर याला जबाबदार कोण आहेत तर ज्याला साहित्य क्षेत्रातील असो किंवा कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च पद मिळवण्याची अघोरी भूक, त्यातून होणारी नवसाहित्यकांची, प्रत्येक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्याची केली जाणारी मुस्कटदाबी, त्यामुळे हे नवसाहित्यिक किंवा नवीन क्षेत्रात पदार्पण करणारे कोणाच्याही वाट्याला जात नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील सुज्ञ अशा वाटमाऱ्या सहन करतात किंवा त्यांचे समर्थन करतात म्हणून अशा लोकांना शुभेच्छा देताना आता खरंच विचार करण्याची गरज झालेली आहे. मुळातच साहित्यिकाने हे आभार पत्र ही साहित्यिकाच्या भाषेतच लिहिलेले आहे आणि मग त्या साहित्यिकाचा भाषेत शुभेच्छा देणाऱ्यांना एका शब्दात शाब्दिक मार द्यायचा आणि दुसर्या शब्दात त्यांना आदरपूर्वक आभार मानून कुरवाळायचे ही विसंगती या साहित्याने त्या ठिकाणी अधोरेखित केलेली आहे. म्हणूनच आज असे तथाकथित साहित्यिक स्वतःला जर मोठे आणि भाग्यविधाते समजत असतील तर अशा साहित्यिकांचे कान वेळीच टोचणे गरजेचे आहेत.वास्तविक पाहता शुभेच्छा देणाऱ्याला कोणाकडूनही कशाची अपेक्षा नसतानाही असले तथाकथित लोक स्वतःला थोर व मोठे हे समजून घेत असतील तर अशा लोकांना शुभेच्छा देताना शुभेच्छा द्याव्यात की नाही हा महत्त्वाचा प्रश्न शुभेच्छुकां पुढे उभा राहतो, पण त्यातही खरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या साहित्यिकांने शुभेच्छुकांची जी शाब्दिक कानउघडणी केली आहे त्याला तोड नाही, त्यातून त्या साहित्यिक आणि शुभेच्छुक यांची औकात दाखवून दिली आहे. म्हणून यापुढे वाढदिवसाच्या किंवा इतर शुभेच्छा देताना शुभेच्छुकांने ही सुद्धा विचार करूनच शुभेच्छा दिल्या पाहिजे. म्हणजेच त्या साहित्यिकाचं आभार पत्र हे शुभेच्छा देणाऱ्याच्या डोळ्यात जळजळीत काजळ घालणारे आहे. म्हणूनच सदर आभार पत्राचा जर आपण गांभीर्यपूर्वक विचार केला तर आपल्याला असे म्हणता येईल की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणार्याचे हातही घ्यावे, असा व्यापक दृष्टीकोन ठेवणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्यकृतीला संकुचित करण्याचे काम नवीन तथाकथित साहित्यिक करत आहेत, त्यामुळे त्या साहित्यिकाचे आभार पत्र हे समझनेवाले को इशारा काफी होता है। ह्या प्रकारातील आहे. पण शुभेच्छुक किती मनावर घेतील हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे कारण ऊठसूट कोणत्याही नेत्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाचे बॅनर व होर्डिंग्स आपल्या खिशातून पैशाने लावायचे, मित्राचा वाढदिवस साजरा आपण करायचा, आपण शुभेच्छा द्यायच्या आणि हे शुभेच्छा देणारे जर आपली औकात दाखवुन आपल्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवत असतील तर अशा लोकांपासून आपण दूर राहिले पाहिजे, त्यामुळे इथून पुढे कोणाला जर आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असाल तर त्या शुभेच्छा ह्या विचारपूर्वकच दिल्या पाहिजेत.









No comments:
Post a Comment