मतदार वर्तन आणि पदवीधर व शिक्षकांच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया
भारताच्या लोकशाही आणि संवैधानिक व्यवस्थेचा आधारस्तंभ म्हणजेच निवडणुका होय. निवडणुकातील सगळ्यात मोठा घटक म्हणजेच मतदान होय.मतदान हा लोकशाहीतील आपला सर्वात मोठा हक्क आणि शांततामय मार्गानं परिवर्तन करण्याचं साधन आहे.परंतु या हक्काची ताकद आजही काही मतदारांना समजली नाही. परंतु आपण लोकशाहीत वावरत असल्यामुळे शासनाकडून सुशासनाची अपेक्षा करतो पण आपल्याकडील ग्रामपातळीपासून ते देशपातळीपर्यंत होणाऱ्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहता आपल्याकडे मतदान करण्याची संकल्पना योग्य प्रमाणात रुजलेली नाही.यामुळेच ग्रामपातळीपासून देशपातळीपर्यंतच्या प्रशासनात सर्वांचा वाटा दिसत नाही त्यामुळे आपल्याकडे शासनात सर्वांचे प्रतिबिंब दिसत नाही. त्यामुळे भारतीय लोकशाहीत अनेक चुकीचे उमेदवार निवडून येतात याचा विचार आपण करणं गरजेचे ठरते. कारण आपल्या देशातील बहुतेक मतदार असे आहेत जे केवळ मत देण्यासाठी जातात, त्यांना मत कोणास द्यायचे आहे, मतदान का करायचे आहे,मतदान का आवश्यक आहे, ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे मतदानाचा सारासार विचार आपल्याकडे होत नाही. परंतु आपल्याकडे बहुसंख्य मतदारांना मतदानाचा अधिकार कसा वापरायचा हे ही माहित नसले तरी ही आपल्याकडील मतदान करणारे मतदार हे सुज्ञ व जागृत आहेत ते शांततामय मार्गाने परिवर्तन घडवून आणतात हेच आपल्या लोकशाहीच यश म्हणावे लागते त्यामुळे भारताला निवडणुकांचा देश असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
आपल्याकडे आज वेगवेगळ्या प्रकारचे मतदान करणारे मतदार आपल्याला दिसून येतात.त्यामध्ये राजकीय पक्षाची हवा पाहून आपलं मतदान वाया जाऊ नये या उद्देशाने मतदान करणारा मतदार, स्थानिक पार्श्वभूमी व स्थानिक प्रश्नांची जाण असणारा उमेदवार म्हणून मतदान करणारे मतदार, जात, धर्म भावकी, सोयरे धायरे, जवळचा उमेदवार, म्हणजेच तुम्ही कुर्मी असाल तर तुम्ही कुर्मीला मतदान करता, जर यादव असाल तर यादवांना मतदान करता, मुस्लिम असल्यास मुस्लिम उमेदवारास मतदान करता, मराठा असाल तर मराठा उमेदवारास मतदान करता, अनुसूचित जाती व जमातीचे असल्यास त्याच उमेदवाराला मतदान करायचे, व हे करतानाच आपल्या जातीचा उमेदवार निवडत असताना सुद्धा त्यात हलका आणि भारी पाहून मतदान करणारे ही मतदार आपल्याकडे आहेत, तसेच माध्यमांच्या प्रभावाखाली व माध्यमांच्या प्रभावाचा विचार करून मतदान करणारे मतदार, घरच्यांनी सांगितले ह्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मतदान करणारे मतदार, कोणत्याही निवडणुकीत कधीच मतदान न करणारे मतदार, आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे पैशाची, पार्ट्यांची देवाण-घेवाण करून मतदार करणारे मतदार, आणि इतर पद्धतीने मतदान करणारे मतदार व सगळ्यात महत्वाचे म्हणजे विकासाला भर देणारा ही मतदार आपल्याकडे आहे पण पर्यायाने त्यांची संख्या कमी आहे,म्हणजेच आपल्याकडे बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचा मतदार आढळून येतो, त्यामुळे आपल्याकडे सुशासनाची संकल्पना ही प्रभावीपणे रुजल्या गेली नाही हे वास्तव आहे. त्यामुळे अनेक समाजांचे,तरुणांचे सुशिक्षितांचे, शेतकऱ्यांचे,व इतर सर्वांचे प्रश्न अद्यापही सुटू शकले नाहीत.
ज्या प्रमाणात सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी सभागृहात असतात त्याचप्रमाणे सुशिक्षित लोकांचे प्रतिनिधित्व करणारे हे प्रतिनिधी सभागृहात सुशिक्षित मतदार निवडून देतात, त्यामध्ये पदवीधरांचे आमदार, शिक्षकांचे आमदार हे सुशिक्षित लोकांचे आमदार म्हणून सुशिक्षितांचे प्रतिनिधित्व करतात, एकंदरीत सर्वसामान्य लोकांचा मतदानाकडे पाहण्याचा जो कल आहे तोच सुशिक्षितांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतो, त्यामुळे त्यामुळे आजही शिक्षकांचे, पदवीधरांचे प्रश्न या राज्यात सुटू शकलेले नाहीत,पदवीधरांच्या आणि शिक्षकांच्या मतदारसंघात पूर्वी पदवीधर आणि शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सभागृहामध्ये निवडून जायचे परंतु कालांतराने या ही मतदारसंघांवर राजकीय पक्षांनी आक्रमण केले,त्यामुळे पदवीधरांच्या, शिक्षकांच्या संघटना आता मागे पडून राजकीय पक्षाचे प्रतिनिधी हे सुशिक्षितांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी सरसावले आहेत, परंतु राजकीय पक्षाचे प्रतिनिधी निवडून दिल्याने हे प्रतिनिधी शिक्षकांचे व पदवीधरांचे कधीही होत नाहीत तर ते राजकीय पक्षांचे प्रतिनिधित्व करतात,ते राजकीय पक्षांचा अजेंडा राबवतात आणि त्याच राजकीय पक्षाच्या अजेंड्याला पदवीधरांना आणि शिक्षकांना बांधण्याचं काम ह्या निवडणुका व लोकप्रतिनिधी करताना दिसून येतात.एकंदरीतच सर्वसामान्यांच्या निवडणुका आणि सुशिक्षितांच्या निवडणुका ह्यांचा आपण विचार केला तर ह्यांच्या निवडणुकीची व निवडणुकीत मतदान करण्याची पद्धत ही वेगळ्या प्रकारची आहे. सर्वसामान्यांच्या निवडणुका ह्या आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने ईव्हीएम मशीनद्वारे व उमेदवारांना मिळालेल्या चिन्हाच्या आधारे होत आहेत, पण सुशिक्षितांच्या निवडणुका मात्र बॅलेट पेपरच्या माध्यमातून होताना दिसतात.
पदवीधर व शिक्षकांच्या होणाऱ्या ह्या निवडणुकांना एकल संक्रमण मतदान पद्धती असे म्हणतात. एकल संक्रमण पद्धतीमध्ये निवडणुकीत एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे मतदार पसंतीच्या क्रमवारीत मतदान करतात. म्हणजेच मतदार मतपत्रिकेमध्ये उमेदवारांच्या नावासमोर आपला पसंतीचा क्रम लिहितो.या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या सर्व वैधमतांचा व निवडून द्यावयाच्या प्रतिनिधींचा विचार करून निवडून येण्यासाठी मतदानाचा कोटा ठरवला जातो.साहजिकच मताचा कोटा पूर्ण करणारा व आवश्यक मते मिळवणारा उमेदवार निवडून येतो. तसेच मताचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे इतर उमेदवारांची मते विभागली जातात व निवडून येण्याचा कोटा पूर्ण केला जातो. म्हणूनच या पद्धतीला एकल संक्रामण मत पद्धती किंवा सिंगल ट्रान्सफरेबल व्होट असे देखील म्हटल्या जाते. एकंदरीतच ही मतदानाची पद्धती अतिशय किचकट स्वरूपाची असल्यामुळे या पद्धतीत मतमोजणीस वेळ लागतो,म्हणूनच ही मतदानाची आणि मतमोजणीची पद्धती बदलली पाहिजे असे अनेकांना वाटते.
त्यामुळे ह्या मतदानाची आणि मतमोजणीची प्रक्रिया पाहता निवडणुकीत बाद होणार्या मतांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपले मत योग्य पद्धतीने नोंदवणे व मतदान बाद होऊ नये याकरिता सुशिक्षितांच्या मतदान प्रक्रियेमध्ये सुशिक्षितांनी कोणत्या पद्धतीने मतदान करावं याची जागृती मोठ्या प्रमाणात करावी लागते, कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये नवमतदारांचा वाटा मोठा असतो, नवमतदार प्रथमच एकल संक्रमण पद्धतीने मतदान करतात त्यामुळे त्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात साशंकता निर्माण झालेली असते, त्यामुळे नवमतदारांनी व जुन्या मतदारांनी या निवडणुकीत मतदान कोणत्या प्रकारे करावे व आपले मत बाद होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.म्हणून पदवीधर व शिक्षकांच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्यां मतदारांनी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात.
केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळा शाईचा स्केच पेननेच मत नोंदवावे इतर कोणत्याही पेन-पेन्सिल, बॉलपेनचा वापर करण्यात येऊ नये.
तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर '1' हा अंक लिहून पसंतीक्रम नोंदवावा.
निवडून द्यायच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जेवढे उमेदवार आहेत तेवढे पसंती क्रमांक आपण देऊ शकतात.
आपले इतर पसंती क्रमांक उर्वरित उमेदवारांच्या नावासमोर 2,3,4,5,6------20 असे नोंदवू शकतात.
एका उमेदवाराच्या नावासमोर एकच पसंती क्रमांक द्या, ज्या उमेदवारांच्या नावापुढे आपण पसंती क्रमांक दिला असेल तोच पसंती क्रमांक इतर उमेदवाराच्या पुढे नोंदवू नका.
पसंती क्रमांक हे 1,2,3,4 ह्याच पद्धतीने नोंदवावे.पसंती क्रमांक एक-दोन-तीन असे शब्दात लिहू नयेत.
पसंतीक्रम नोंदवताना वापरायचे अंक हे भारतीय अंकाच्या अंतराष्ट्रीय स्वरूपात 1,2,3, असे असावे किंवा रोमन अंकात I,Il,III ह्या पद्धतीने नोंदवावे किंवा मराठी भाषेत देवनागरी लिपीत १,२,३,४ असे नोंदवावेत.
मतपत्रिकेत कोठेही आपले नाव, स्वाक्षरी, अद्यअक्षरे किंवा इतर कोणतेही शब्द नोंदवू नयेत, तसेच कुठेही अंगठ्याचा ठसा उमटवू नये.
मतपत्रिकेवर मत नोंदवताना √ X अशी कोणतीही खून करू नये.
आपली मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर पहिल्या पसंतीचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे. अन्य पसंती क्रमांक नोंदवणे हे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.
निवडणूक आयोगाने वरील नेमून दिलेल्या नियमाच्या व्यतिरिक्त पद्धतीने आपण जर मतदान केले तर ते मतदान बाद होते, म्हणून वरील नियमानुसारच प्रत्येक पदवीधरांनी व शिक्षकांनी मतदान करणे गरजेचे आहे.
एकंदरीतच भारतीय मतदारांचे वर्तन पाहता भारतीय मतदार हा वेगवेगळ्या पद्धतीने मतदान करताना आपल्याला दिसून येतो. त्याला सुशिक्षित, पदवीधर व शिक्षकही अपवाद नाहीत. त्यामुळे भारतीय मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होणे गरजेचे आहे. कारण भारतीय लोकशाहीत समतेचे बीज रुजवण्यासाठी सर्वसामान्य मतदार, पदवीधर मतदार, शिक्षक मतदार जागृत असणे गरजेचे आहे.त्यामुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षकांच्या निवडणुकीत प्रत्येक पदवीधरांनी व शिक्षकांनी जागृत होऊन आपल्या विवेकबुद्धीने मतदान करून लोकशाही बळकट व सक्षम करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच पदवीधरांचे व शिक्षकांचे प्रश्न सुटतील.
.









महामानवाने मतदानरुपी ब्रम्हास्र जो पर्यंत विकलं जाईल तो पर्यंत अपेक्षित परिणाम मिळणं अवघड आहे. नोट आल्याशिवाय वोट नाही ही प्रवृत्ती संपत नाही तो पर्यंत आत्मपरीक्षण करणं अपेक्षित आहे. नेते आपलं भलं कसं होईल यातच मश्गूल आहे. जातीच्या आधारावर मतदान हा लोकशाहीला कलंक आहे.फक्त मोजक्या जातीचे उमेदवार उभे राहतात.पैशाचं थैमान जोवर थांबत नाही तोवर अवघड आहे. कामं कार्यकर्ते यांची नव्हे तर नातेवाईकांची होतात.
ReplyDeleteधन्यवाद👏👏👏👏
Deleteहीच मानसिकता बदलणे गरजेचे आहे
Good, views
ReplyDeleteधन्यवाद👏👏
DeleteVery important Information Thanks Sirji.
ReplyDeleteधन्यवाद 👏👏👏
DeleteVery important information
ReplyDeleteधन्यवाद सर 👏👏👏
Deleteछान सर..संघटना महत्त्वाचे आहे
ReplyDeleteधन्यवाद सर 👏👏👏
Deleteकालसुसंगत लिखाण
ReplyDeleteधन्यवाद सर 👏👏👏👏
DeleteImportant for new cumours/voters
ReplyDeleteThanks Dr.kilche sir..
Thanks 👏👏👏
DeleteExcellent and very informative...
ReplyDeleteछान मांडणी केली सर
ReplyDelete