गुरूंचे गुरुत्व हा व्यक्तीमत्त्वाचा आरसा......
गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु,
गुरु देवो महेश्वरा,
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरुवे नमः
गुरूंचा महिमा सांगणारी आणि गुरूं शिष्य नात्याची जोपासना करणाऱ्या भारतीय संस्कृतीत गुरूला अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्याने ती परंपरा आणि महिमा शिक्षकी पेशात असणाऱ्या डॉ. गंगाधर वाळले लिखित गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती जपताना दिसून येते. शिक्षकांनी घेतलेली जबाबदारी खरोखरच शिक्षकांना समजली आहे का? आणि त्यांची जाणीव त्यांना आहे का? ह्या प्रश्नाची उकल करणारी ही साहित्यकृती नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ह्या साहित्यकृतीद्वारे लेखकाच्या आत्मकथनापासून ते त्यांच्या जीवनात आलेल्या 111 शिक्षकांच्या चरित्राचा ठाव या साहित्यकृतीने घेऊन त्या शिक्षकांपासून मला काय मिळाले ह्याचा लेखाजोखा मांडणारी गुरूंचे गुरुत्व ही समृद्ध साहित्यकृती होय. कारण आजच्या काळात गुरूंचा महिमा कमी होत असताना, एखादा शिक्षक गुरू-शिष्याच्या नात्याला साहित्याच्या माध्यमातून उजाळा देतो ही साहित्यकृती क्षेत्रातील मोठी घटना आहे. म्हणूनच गुरु शिवाय आपण आपल्या आयुष्याला वळण देऊ शकत नाही ह्या वास्तविकतेची अनुभविक स्वरूपात मांडणी म्हणजेच गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती होय. प्रस्तुत साहित्यकृतीत एकूण आठ भागात विभागलेली असून एकूण 500 पानाच्या ह्या साहित्यकृतीत लेखकांचं बालपण, शालेय शिक्षण, समाज शिक्षण, डी एड प्रशिक्षण, शिक्षक अनुभव, विस्तार अधिकारी अनुभव, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अनुभव, आणि डायट शिक्षण अशी लेखकाची जडणघडण आहे. या जडणघडणीत जवळपास आपल्या जन्मापासूनच्या प्रवासाचे गुरू ते संशोधक मार्गदर्शकपर्यंतच्या टप्प्यांवर भेटलेले वेगवेगळे शिक्षक,समाज शिक्षक हे लेखकाचं जीवन कसं समृद्ध करून गेले ह्याची मांडणी त्यांनी सविस्तरपणे मांडलेली आहे. सदर साहित्यकृतीस सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ.ह.ना. जगताप सरांची आणि डॉ. पुरुषोत्तम भापकर, माजी शिक्षण आयुक्तयांची प्रस्तावना असल्यामुळे ही साहित्यकृती एक शिक्षकांचा आदर्शत्व वाढवणारी आहे. म्हणूनच या साहित्यकृतीद्वारे आजच्या होऊ घातलेल्या शिक्षकांना व कार्यरत असलेल्या शिक्षकांना आपण योग्य पध्दतीने कार्य करत गेल्यास आपला सन्मान आपले विद्यार्थी कसे करतात त्याची पावती देणारी ही साहित्यकृती असल्यामुळे आज शिक्षकांकडे पाहण्याची समाजाची जी मानसिकता आहे ती मानसिकता पुसून टाकण्याची क्षमता या साहित्यकृतीने निर्माण केली आहे.
मुळातच गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती वाचताना लेखकांची बालपणातील झालेली जडणघडण वाचताना अक्षरशः वाचकांच्या डोळ्यात पाणी येते. गरीब अशिक्षित कुटुंबात जन्म होऊनही समाजात सदगुणाने व सदाचारी वर्तनाची शिकवणी आई वडिलांच्या विद्यापीठात मिळाल्यामुळे लेखकावर अध्यात्मिकवादाचा आणि त्यांच्या अध्यात्मिक गुरूचा मोठा पगडा आहे, कारण जीवनातील सर्व समस्या सोडविण्यासाठी जी शक्ती पाहिजे ती त्यांना अध्यात्मिक गुरूकडून मिळते म्हणून अध्यात्मिक गुरूवरील श्रद्धा ही त्यांना आत्मोन्नतीकडे नेते ह्याचा उल्लेख लेखक करतांना दिसतात. लेखकाला शालेय जीवनातच आपल्या शिक्षकांकडून मिळालेल्या इंग्रजीची, हस्तक्षराची, व्यायामाची सवय,स्वंयशिस्त,भाषासंस्कार इत्यादी मुळे आजही लेखक तत्वनिष्ठ व वास्तववादी जीवन जगतोय त्यामुळे हीच त्यांच्या जीवनाची शिदोरी ठरते. तसेच कावरखे बंधू मुळे आपल्या जीवनाला कसा आकार मिळाला ह्याचाही उल्लेख लेखकाने न चुकता केलेला आहे. तसेच लेखकाच्या वस्तुनिष्ठ वागणुकीमुळे चुकीच्या कामाच्या संदर्भात झालेली लेखकांच्या बद्दलची तक्रारही राजकारण्यांनी कशी सकारात्मक दृष्टीकोनातून सोडवली याचाही उल्लेख लेखकाने केल्यामुळे राजकारण आणि शिक्षण हे कसं हातात हात घालून चालतं याचं उत्तम उदाहरण लेखकाने सांगण्याचं काम या ठिकाणी केलेले आहे. तसेच राजकारणी व्यक्तीकडून झालेला त्यांचा पहिला सत्कार ही त्यांच्या जीवनासाठी कलाटणी ठरली. तसेच राजकारण्यासोबत राहूनही राजकारण्यांचे गुण स्वतःला लागू न देण्याचं कौशल्य लेखकाने जोपासलेले आहे. तसेच लेखकांनी ज्या ज्या ठिकाणी काम केल्या त्या संस्था व त्या ठिकाणचे अनुभव हे त्यांचे गुरूच्या रूपात आहेत.
म्हणूनच कोणत्याही परिस्थितीचे भांडवल न करता आल्या परिस्थितीला सामोरे जाऊन चातक पक्षी ज्याप्रमाणात पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणात लेखकांने ज्ञानाची व अनुभवाची सांगड घालून आपली ज्ञानलालसा अद्यापही कमी झालेली नाही हे नव्या पिढीच्या शिक्षकांपुढे आदर्श म्हणून ठेवण्याचे काम लेखकाने केले आहे ही वस्तुस्थिती आहे. गुरूंच्या नियोजनातून सुरु केलेला शिक्षकी पेशा हा वर्ग एक पदापर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि त्याचं सर्व श्रेय हे आपल्या गुरूला आहे हे सांगण्याचं धाडस लेखकाच्या मोठेपणाचा हा श्वास आहे. वास्तविक पाहता लेखकांने शेतीपासून ते दवाखाना, हॉटेल पर्यंतची सर्व कामे करून ही त्याचा कधीही गाजावाजा केला नाही किंवा त्याचं भांडवल केलं नाही हीच खऱ्या अर्थानं आपल्या गुरूला दिलेली गुरुदक्षिणा होय. म्हणूनच आपली नोकरी करता करता मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग लेखकाने ज्ञानप्राप्तीसाठी व पदव्या मिळवण्यासाठी उचलला हे ही खरे आहे म्हणूनच लेखक आजच्या शिक्षकांसाठी एक आदर्शरुपी हिरा ठरतो. कारण आजचे शिक्षक नोकरीला लागल्यानंतर नोकरी एके नोकरी करताना आपलं शिक्षण बंद करतात, खरं तर शिक्षक हा कायमस्वरूपी विद्यार्थी असतो हे तत्व काही शिक्षक विसरतात पण हे तत्व लेखकांनी विसरलेले नाही. म्हणजे शिक्षणाने समृद्ध होणाऱ्या ध्येयवेड्या शिक्षकांची ही एक आदर्शवत कहाणी म्हणजेच गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती होय. शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी अविरत प्रक्रिया आहे ही शिक्षणाची व्याख्या लेखकाने तंतोतंत पाळलेली आहे. त्यामुळे साधा डीएडचा एक शिक्षक हा जिल्हा प्रशिक्षण संस्थेचा वरिष्ठ अधिव्याख्याता होऊ शकतो तो इच्छाशक्तीच्या आणि श्रद्धेच्या जोरावर,त्यासाठी आवश्यक असते ती स्वयंशिस्त आणि वस्तुनिष्ठ कामाची स्वतःला सवय, व वस्तुनिष्ठ कामाची दुसऱ्याकडून अपेक्षा व स्पष्टवक्तेपणा तसेच इतरांच्या चुकीच्या कामाला चूक आणि चांगल्याच कौतुक करण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येक शिक्षकांमध्ये विकसित होणे अपेक्षित आहे तो दृष्टिकोन विकसित करण्यासाठी गुरु किती उपयोगी पडतात याची मांडणी गुरूंचे गुरुत्व या साहित्यकृती मध्ये आहे. म्हणूनच जोपर्यंत तुम्ही आपल्या कर्तव्यात कठोरपणा ठेवत नाहीत तोपर्यंत आपण यशाला गवसणी घालत नाही हा वास्तुपाठ ही साहित्यकृती प्रत्येकाला घालून देते. म्हणूनच तुम्ही कोणत्याही जीवनात वावरताना न्याय तत्त्वाचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं आणि तोच न्याय हा सर्वांना सारख्या स्वरूपात देण्याची किमया जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने शिक्षक म्हणून यशस्वी होऊ शकत नाही हीच शिदोरी लेखकाने आपल्या गुरुंकडून घेतलेली आहे. तसेच कोणतेही काम करताना आपला मुद्दा वरिष्ठांना कसा पटवून द्यायचा आणि आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांकडून काम करून घेण्याचं कौशल्य आत्मसात कसे करायचे हे सुद्धा गुरुच शिकवतात. तसेच आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणच्या आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाचे तोंड भरून केलेले कौतुक हे आपल्या कामावरची निष्ठा वाढवतात त्यामुळे आपल्या कामात कोणतेही अडचणी व समस्या निर्माण होत नाही ही वस्तुस्थिती लेखकाने आपल्या गुरूंकडून स्वीकारलेली आहे.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्या पदावर जाताना आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या व आपल्या माणसांच्या ओळखी कायम ठेवण्याचे कौशल्य सुद्धा लेखक गुरुकडून शिकतात.तसेच प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आणि प्रत्येक घटनेचा सकारात्मक विचार करण्याची शैली लेखकातत रूजली आणि त्याच सकारात्मक गोष्टीच्या आधारावर मिळालेल्या पदाला न्याय देण्याची भूमिका ही लेखकाकडे असल्यामुळे आजही लेखकाचे पाय जमिनीवरच असल्याचे दिसून येतात. त्यामुळे इतरांच्या मताचा आदर करणं आणि आनंदाने जगू या आणि आनंदाने सेवा देऊया या सूत्राचा स्वीकार लेखकाने केलेला आहे. त्यामुळे लेखकाच्या जीवनात आलेल्या प्रत्येक गुरूंच्या गुरुत्वाची समीक्षा करताना लेखकाने प्रत्येक गुरूंकडून कोणता न कोणता गुण स्वीकारला आहे हे वास्तव आहे आणि त्याच गुणाच्या जोरावर आज लेखकाची जी काही यशस्वी वाटचाल सुरू आहे हाच त्याचा खरा मूलमंत्र आहे. म्हणूनच गुरूंचे गुरुत्व हे प्रत्येकाच्या जीवनाला पूर्णत्व देत असते यात शंका नाही. म्हणुनच गुरुविना जीवनाला आधार नाही ही गुरुची परंपरा लेखकांने जोपासलेली आहे आणि तीच परंपरा येणाऱ्या काळात प्रत्येकांनी जोपासावी हा या साहित्यकृतीच्या मागचा उद्देश आहे.तसेच या साहित्यकृतीची भाषाशैली ही वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवते. गुरुचे गुरुत्व या साहित्यकृतीने साहित्य क्षेत्रात एक नवा आदर्श उभा केलेला दिसतो आणि त्यामुळेच गुरूंचे गुरुत्व ही साहित्यकृती ही इतर साहित्यापेक्षा वेगळी आहे. तसेच लेखकांनी मुखपृष्ठावर मोबाईलचे चित्र दाखवून आधुनिक तंत्रज्ञानात मोबाइलही हा कसा गुरु ठरतो हे दाखवण्याचे काम लेखकाने केलेले आहे. म्हणूनच आपल्या जीवनात आलेला प्रत्येक गुरु हेच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा ठरतात ही वस्तुस्थिती लेखकाने आपल्या समोर साहित्यकृतीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.म्हणूनच गुरूंचे गुरुत्व या साहित्यकृतीचे वाचक निश्चितच स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
साहित्यकृतीः गुरूंचे गुरुत्व
लेखकः डॉ. गंगाधर वाळले गोरेगावकर
प्रकाशकः शांभवी प्रिंटर्स अँड पब्लिशर्स, औरंगाबाद
पृष्ठः 500
किमंतः ४५१ रू









No comments:
Post a Comment