नंदिग्राममध्ये ममता जिंकतील का?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची दिशा रोज बदलत असल्याने भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे जनतेची मात्र करमणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. वास्तविक पाहता कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून भाजपने ताकद पणाला लावली असल्यामुळे ममता बॅनर्जीं यांच्यासमोर भाजपने मोठे आव्हान निर्माण केल्याचे दिसून येते तरीसुद्धा पश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूल आणि काँग्रेस-डावे अशी तिहेरी लढती होत आहेत. त्यातूनच ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राम मधून लढण्याची जी भूमिका घेतली त्यातूनच खऱ्या अर्थानं बंगालचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो आहे. वास्तविक पाहता ममतांचा सत्तेकडे जाण्याचा मार्ग हा नंदीग्राममधूनच सुरू झाला होता.कारण ममता बॅनर्जी यांनी 'माँ, माती आणि माणुस'' (मां, माटी और मानुष) या चळवळीची सुरुवात २००७ मध्ये नंदिग्राममधूनच केली होती. या चळवळीच्या माध्यमातून व नंदीग्रामच्या संघर्षातून ममता बॅनर्जी यांनी राज्यात ३४ वर्षाच्या डाव्या राजवटीचा पराभव करून सत्ता काबीज केली आणि ती सत्ता पुन्हा एकदा टिकवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात, गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल कॉंग्रेसने 291 जागांसाठी आपले उमेदवार उभे केले आहेत.
ह्यावेळी ममता बॅनर्जी ह्या भवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राम येथून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळताना आपल्याला दिसून येतो. कारण विकास हरवलेल्या ठिकाणी केवळ हिंदुत्वच आपल्याला विजयी करू शकतो ही भाजप व ममता बॅनर्जीची भूमिका झाल्यामुळे प्रचाराचे मुद्दे कमी आणि मंदिरांमध्ये जाऊन पूजा-अर्चा करून आम्हीच कसे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यातच येथील भाजपा उमेदवार आणि ममता बॅनर्जी गुंतल्यामुळे आता सर्वांचे लक्ष नंदीग्रामकडे लागलेले आहे. वास्तविक पाहता या मतदारसंघात भाजपने उभे केलेलेले उमेदवार हे एके काळी तृणमूल काँग्रेसचे नेते होते. पण त्यांनी सध्या ममतांची साथ सोडून आता भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी व या भागातून जवळपास 35 जागा असल्यामुळे जास्ततीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी व या भागाला न्याय देण्यासाठी व येथील आपल्या उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ममता बॅनर्जी तसेच भाजपचे नेतेही नंदिग्राम मध्ये तळ ठोकून आहेत.
नंदीग्राम विधानसभा जागा पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात येते, जिथे अधिकारी कुटुंबाचे वर्चस्व आहे. पण अशा परिस्थितीत ममतांचे येथील आगमन सर्वांनाच आश्चर्यचकित करते आहे. कारण या निवडणुकीत अस्मितेच्या राजकारणापासून, स्थानिक व बाहेरचे,भ्रष्टाचार ते रोजगारापर्यंतचे विषय येथे प्रचलित आहेत.परंतु सर्वाचे लक्ष वेधल्या जाते ते भूमिपुत्र असलेल्या शुभेंदू अधिकारी यांच्या जाहिरातीने.तसेच ममतांची ही मतदारसंघात पोस्टर्स लावली असतानाही ममता बॅनर्जी यांना विरोध म्हणून बाहेरच्या उमेदवार म्हणून दर्शविणारी पोस्टर्स ही लक्ष वेधतात.म्हणूनच निवडणूक प्रचाराच्या सुरूवातीला भाजप नेत्यांना बाहेरचे म्हणणाऱ्या ममता बॅनर्जी यांनाही नंदीग्राममध्ये स्वत:ला बाहेरच्या उमेदवार म्हणून स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. परंतु मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने येथील समीकरणे बदलले आहेत. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात आहे. ही जागा तामलूक लोकसभा मतदारसंघात येते. अधिकारी शुभेंदू या जागेवर आमदार होते. परंतु अलीकडेच त्यांनी टीएमसीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते आता ममता बॅनर्जी यांच्याविरूद्ध बोलत आहेत.
२०११ च्या जनगणनेच्या अंदाजानुसार एकूण ३३१०५४ लोकसंख्येपैकी ९६.६५ लोकसंख्या ग्रामीण व ३.३५ शहरी लोकसंख्या आहे. तर एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती (अनुसूचित जाती) आणि अनुसूचित जमाती (एसटी) चे प्रमाण अनुक्रमे १६.४६ आणि ०.१ आहे.तसेच महिष समुदायाची लोकसंख्या नंदीग्राममध्ये ५३टक्के आहे. हा समुददाय मुख्यतः शेती करणारा आहे. त्यांच्यामुळेच नंदीग्राम आंदोलन यशस्वी झाले होते. सध्या भाजपला विश्वास आहे की महिष समाजाचे मते आपल्याला मिळतील पण राजकीय समिक्षकांच्यामते नंदीग्राममध्ये दलित मतदारांचे मतेही खूप महत्वाचे ठरणार आहेत. तसेच नंदीग्राम हा अल्पसंख्याकबहुल भाग असून येथील उमेदवारांचे भवितव्य अल्पसंख्याक मतदारावर अवलंबून आहे. कारण या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ही ३५ टक्क्यांच्या जवळपास आहे तर हिंदू मतदारांची संख्याही ५० टक्केच्या जवळपास आहे. मुस्लिम मताच्या संख्येवर व इतर मतदारांवर लक्ष ठेवून ममता बॅनर्जी यांनी ही जागा निवडली आहे. परंतु या अधिकारी बंधुचा ही प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नंदिग्रामची जागा आता ममता आणि शुभेंदू आधिकारी यांच्या प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. त्यातूनच भाजपने पश्चिम बंगालमध्ये सर्वप्रथमच एवढे लक्ष घातले असून, बंगालमधील प्रचार मोहिमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लक्ष ठेवून आहेत.एकंदरीतच मतदारसंघातील अधिकारी बंधूंचा प्रभाव पाहता व हिंदू मतांची संख्या लक्षात घेता भाजपाला व भाजपाच्या नेत्यांना असा विश्वास वाटतो की ममता ह्या कमीत कमी ५० हजार मतांनी पराभूत होतील. कारण २०१६ मध्ये शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली त्यावेळी त्यांना या जागेवर ६६ टक्के पेक्षा जास्त मते मिळाली होती त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास पुन्हा वाढलेला दिसतो.परंतु मुस्लिम मतदार येथे निर्णायक असल्याने नंदीग्राम मतदारसंघातील मागील तीन निवडणुकांच्या निकालांवर जर नजर टाकली तर पहिले आणि दुसरे दोन्ही उमेदवार मुस्लिम होते. २०११ मध्येही येथे मुस्लिम उमेदवार विजयी झाला होता हे विशेष आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विजय-पराभूतमधला फरक २६ टक्के होता.२००६ च्या विधानसभा निवडणुकीत माकपचे इलियास मोहम्मद या जागेवर विजयीझाले होते. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात शुभेंदू अधिकारी यांच्या ताकदीबद्दल बोलताना पूर्वी हा जिल्हा व त्याच्या आसपासचे भाग डाव्याचे बालेकिल्ले होते परंतु गेल्या 12 वर्षांपासून अधिकारी कुटुंबाचे येथे राजकीय वर्चस्व आहे. शुभेंदूचे वडील आणि टीएमसीचे दिग्गज नेते शिशिर अधिकारी हे पूर्व मिदनापूरचे खासदार होते. शिशिर अधिकारी मनमोहन सिंग सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्रीही राहिले आहेत. सुवेंधू अधिकारी यांचे बंधू दिवेन्दु अधिकारी हे पूर्व मिदनापूरमध्येच तमळूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.शुभेंदू या जागेवरुन दोनदा खासदारही राहिले आहेत.पण २०१६ मध्ये जेव्हा ते नंदीग्रामचे आमदार झाले तेव्हा त्यांनी तामलुक लोकसभेची जागा आपल्या भावाला दिली आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत त्याना ६७ टक्के पेक्षा जास्त मते मिळाली होती हे ही विशेष म्हणावे लागेल.
पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात सलीम समूहाला ‘विशेष आर्थिक क्षेत्र’ धोरणांतर्गत नंदीग्राममध्ये रासायनिक केंद्र स्थापित करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता.राज्य सरकारच्या ह्या निर्णयाच्या विरोधात विरोधी पक्षांनी भूसंपादनाच्या विरोधात आवाज उठविला.त्यातुनच टीएमसी, एसयूसीआय, जमात उलेमा-ए-हिंद आणि कॉंग्रेसच्या सहकार्याने भू-निर्मुलन प्रतिरोध समिती (बीओपीसी) ची स्थापना केली गेली आणि सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले. या चळवळीचे नेतृत्व तत्कालीन प्रतिस्पर्धी नेत्या ममता बॅनर्जी यांनी केले होते आणि त्याचे नायक शुभेंदू अधिकारी होते. तेच अधिकारी हे ममता बँनर्जी ह्याचा विरोधात उभे राहिले आहेत. एकंदरीतच नंदीग्राम चळवळीला निवडणुकीचा मुद्दा बनवून विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी डाव्यांना पराभूत करू शकल्या होत्या हे विशेष आहे.एकंदरीतच शुभेंदू अधिकारी हे तृणमूल कॉंग्रेसचे मोठे नेते होते तसेच त्यांना ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय नेते मानले जात होते. परंतु, ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि लोकसभेचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर नाराज होऊन त्यांनी पक्षातून राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पश्चिम बंगालमधील बहुचर्चित चिट फंड घोटाळ्यात शुभेंदू अधिकारी ह्यांच्या नावाची चर्चा असल्याने व या घोटाळ्यामध्येही त्यांचा हात असल्याचा आरोप असल्याने तुरुंगात जाण्याच्या भीतीने शुभेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असे म्हटले जाते.
एकंदरीतच ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या योग्य नाही अशी स्थानिक पातळीवर चर्चा आहे. परंतु खरे म्हणजे भाजपा नेत्यांना अंगावर घेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे ही वस्तुस्थिती आहे कारण पश्चिम बंगालमध्ये भाजपा कधी नव्हे तर यावेळी पूर्व ताकदीनिशी ममता बॅनर्जीचा पराभव करण्यासाठी सरसावलेला आहे आणि त्याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपला शह देण्यासाठी ममता बॅनर्जी नंदिग्राम मध्ये निवडणूक लढण्यास आलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु पश्चिम बंगालमधल्या राजकीय विश्लेषकांचे मतमतांतरे यापेक्षाही वेगळ्या स्वरूपाची आहेत. तसेच ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरची जागा सोडण्याचा आणि नंदीग्राममधून निवडणूक लढविण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा करता पुढील एक मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे भवानीपूर जागेवर ममता यांना २०११ मध्ये ७७.४६ टक्के मते मिळाली होती, ती २०१६ मध्ये कमी होऊन ४६ टक्क्यांवर आली आहेत. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला या जागेवर मोठा धक्का बसला होता,भवानीपूर या विधानसभेच्या जागेवर भाजपापेक्षा केवळ तीन हजार मते तृणमूल कॉंग्रेसला आधिक मिळाली. तसेच, त्यालगतच्या रासबेहरी जागेवर तृणमूल कॉंग्रेस ५००० मतांनी मागे राहिल्याने ही आकडेवारी पाहता ममता बॅनर्जी यांना चिंता निर्माण झाली आहे.परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ममता बॅनर्जी या निवडणुकीत भाजपसाठी "बंगाली विरुद्ध बाहेरील लोक" हा मुद्दा उपस्थित करीत आहेत आणि भवानीपूरची ७० टक्के लोकसंख्या गैर बंगाली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने गुजरातीची संख्या ही जास्त आहे. म्हणूत अशा परिस्थितीत ममतांना भवानीपूरमध्ये दगाफटका होऊ नये म्हणून ममता बॅनर्जी ह्या नंदिग्राम मध्ये गेलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे.
सद्य परिस्थितीत नंदीग्राम आणि भवानीपूर जागांची तुलना केल्यास नंदीग्राम तृणमूल कॉंग्रेससाठी अधिक उपयुक्त वाटते, असे निवडणूक विश्लेषकांचे म्हणणे आहे. याचे कारण नंदीग्राममधील 35 टक्के मुस्लिम लोकसंख्याचा फायदा ममता बॅनर्जी यांना होण्याची मोठी संधी आहे.कारण नंदीग्राम मतदारसंघात मुस्लिम मतदाराची भूमिका नेहमीच निर्णायक राहिलेली आहे. म्हणून येथील मुख्य राजकीय पक्षांनी प्रत्येक निवडणुकीत येथून मुस्लिम उमेदवारालाच पसंती दिली आहे. म्हणून मुस्लीम मतदार व मुस्लीम उमेदवरच या निवडणुकीचं चित्र बदलू शकतात ही वस्तुस्थिती आहे. याचा फायदा आपल्याला होईल हा राजकीय अंदाज शुभेंदू अधिकारी यांनी बांधला आणि या वेळी माकप येथूनच मुस्लिम उमेदवार देईल व त्यातून मुस्लिम मतदार टीएमसी आणि सीपीआयमध्ये विभागून याचा थेट लाभ मिळू शकेल हा अंदाज खोटा ठरला. कारण यावेळी माकपने नंदीग्राममधील हिंदू आणि तरूण चेहरा मीनाक्षी मुखर्जी यांना तिकीट दिले. त्यामुळे वास्तविक पाहता माकपच्या ह्या नव्या खेळीमुळे भाजपमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असली तरीही शुभेंदू अधिकारी हे पन्नास हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी होतील असा विश्वास आणि दावा त्यांचे कार्यकर्ते करत आहेत.
एकंदरीतच निवडणुकीतील गरमागरम वातावरण पाहता मुस्लीम मतदार हा एक गठ्ठा ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी उभा राहणार हा होरा लक्षात घेता भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी हे सुद्धा हिंदु मतदारांचे मोठ्या प्रमाणात धुव्रीकरण करण्याच्या मागे लागलेले आहेत.म्हणूनच शुभेंदू अधिकारीच्या प्रत्येक मेळाव्यात जय श्री राम च्या घोषणा दिल्या जात आहेत,तसेच ममता बॅनर्जी यांनी या वेळी विजय मिळविला तर पश्चिम बंगालचे काश्मीर होईल ही भीती हिंदू मतदारांना दाखवली जात आहे. म्हणून शुभेंदू अधिकारी यांच्या दौऱ्याची सुरुवात ही ही वेगवेगळ्या मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमाने व दर्शनाने होत आहे. म्हणूनच भाजपा ने नंदीग्राम मध्ये जो नारा तयार केला आहे तो असा ‘बोल रहा है नंदीग्राम, सबके मुंह में जय श्रीराम’आणि तोच कित्ता ममता बॅनर्जी ही गिरवत आहेत. नंदीग्राममधील भाजप नेत्यांच्या ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांना तोंड देण्यासाठी ममताही मागे नाहीत. कारण ममता बॅनर्जी यांनी अनेक मंदिरात दुर्गा सप्तशती व चंडी यांचे वाचन केले आहे.ममता बॅनर्जी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी त्या नंदीग्राममधील सुमारे १२ मंदिरात जाऊन आणि समाधीस्थानावर चादरी अर्पण करून आम्ही तुमच्या पेक्षा कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.
तसेच ममता बँनर्जी ह्या नंदीग्राम चळवळ हा एक महत्त्वाचा निवडणूक मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करीत आहे.त्यांनी नंदीग्राम चळवळीत भाग घेणाऱ्याना, दरमहा १००० रुपये पेन्शन आणि चळवळीच्या काळापासून बेपत्ता असलेल्या त्यांच्या कुटुंबांना चार लाख रुपये दिले जातील ह्यांची घोषणा केली आहे. तसेच नंदीग्राममधील मेळाव्यात ममता बँनर्जी म्हणाल्या की, नंदीग्राममध्ये जेव्हा आंदोलन चालू होते तेव्हा माझ्या घरी कालीपूजा चालू होती. १४ मार्च २००७ रोजी जो गोळीबार झाला तो सर्वांना माहिती आहे. त्यावेळी मी नंदीग्रामला येण्यासाठी निघाली असताना मला थांबवण्याचा प्रयत्न केला जात होता. राज्यपालांनी मला फोनवरुन सांगितले की तुम्ही रात्री नंदीग्रामला जाऊ नये. तरीही मी त्यावेळी झालेल्या अत्याचारावरून मी मागे हटली नाही. माझ्यावरही गोळीबार करण्यात आला, पण मी बंगालच्या बाजूने उभा राहिली ' ही भावनिक आठवण त्यांनी लोकांच्या समोर ठेवली आहे।तसेच निवडणूकीतल वातावरण पाहता नंदीग्रामचे स्थानिक उमेदवार म्हणून शुभेंदू अधिकारी ह्यांना त्याचा फायदा होतो हे निश्चित आहे, तसेच हिंदू मतदानाचे ध्रुवीकरण झाल्यावर ममता बनर्जी यांच्या समोरच्या अडचणी वाढतील परंतु ममताची ताकद ही कमी नाही तसेच ममताचे नेतृत्व आणि मुस्लिम मतदानाची वोट बँक, व आपण मुख्यमंत्र्यांनाच प्रत्यक्ष मतदान करतोय ही मतदाराची भूमिका ह्या त्यांच्या जमेच्या बाजूची वस्तुस्थिती लक्षात घेता भाजपकडून कोणतीही चूक होणार नाही ह्याची पुरेशी काळजी घेतली जात आहे.
एकदरीतच राजकीय विश्लेषक ममता बॅनर्जींची नंदीग्राममधील ही राजकीय खेळी हा 'मास्टरस्ट्रोक' म्हणून पाहतात कारण यामुळे तृणमूल कॉंग्रेसला शुभेंदू अधिकारी ह्याच्या जाण्याने होणाऱ्या नुकसानापासून वाचवता येईल. कारण पूर्व मिदनापूरवर गेल्या १२ वर्षांपासून आणि पश्चिम मिदनापूरची संपूर्ण कमांड शुभेंदू अधिकारी यांच्या ताब्यात होती, त्यांचा या दोन जिल्ह्यांतील ३५ विधानसभा जागांवर चांगला प्रभाव आहे. टीएमसीने २०१६ मध्ये ३५ पैकी ३० जागा आणि २०११ मध्ये सर्वच्या सर्व ३५ जागा जिंकल्या होत्या अशा परिस्थितीत शुभेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे टीएमसीला या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती होती, ती ममता बॅनर्जीच्या येण्याने कमी झाल्याचे दिसून येते. म्हणूनच सत्तेचा सोपान मार्ग पार करण्यासाठीच सुवेंधूला आपल्या छावणीत आणण्याचा प्रयत्न भाजपाने केला ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही.म्हणूनच नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेऊन ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या रणनीतीला मोठा धक्का दिला आहे. तसेच शुभेंदू अधिकारी यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा प्रभाव रोखुन त्यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणे हा त्यामागचा उद्देश असला तरीही ममता बॅनर्जींचा हा निर्णय त्यांच्यासाठी अधिक धोकादायक वाटतो. कारण जर त्यांनी शुभेंदू अधिकारी यांच्याकडून निवडणूक हरली तर लोकांच्या दृष्टीने ममताचे राजकीय महत्त्व कमी होऊन राज्याच्या राजकारणात भाजपला एक सक्षम व मजबूत नेता मिळेल ही वस्तुस्थिती आहे.म्हणूनच आपण सर्वांनी मिळून गुरुदेव रविंद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या स्वप्नातील बंगाल पुन्हा घडवण्याची गरज आहे, असं भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगाल मध्ये करत आहेत. एकंदरितच पश्चिम बंगाल मधील भाजपची रणनीती पाहता कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला त्याठिकाणी सत्ता आणायची आहे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्यास भाजपा तयार आहे आणि म्हणूनच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या गडाला भेदण्याचे काम सुरू केलेले आहे. परंतु अशाही परिस्थितीत ममता बॅनर्जी पाठीमागे हटत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांचा पक्ष फोडण्याचं काम भाजपकडून सुरू झालं आणि त्याला काही प्रमाणात यश मिळाले ते निवडणुकीत टिकेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राम मधून निवडणुक लढवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आणि तेथील तुल्यबळ लढत बघता ममता बॅनर्जीचे अस्तित्व आणि भवितव्य ठरवणारा असणार आहे यात शंकाच नाही.
(लेखातील सर्व फटो गुगलवरून साभार)









Nice article...
ReplyDeleteThanks Sir 👏👏👏
DeleteYou have focused all points.
ReplyDeleteVery good.
Thanks 👏👏👏
Delete